मसाल्यांत कृत्रिम रंग मिसळल्यास मोठी कारवाई

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नवीन नियमावली जाहीर केली आहे. हळद, मिरची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि खसखस यांसारख्या मसाल्यांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग किंवा इतर अनधिकृत पदार्थ मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मसाल्यांचे उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
मसाल्यांमध्ये भेसळ केल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री या सर्व टप्प्यांवर तपासणी व नियमांचे पालन महत्त्वाचे आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार मसाले मिळावेत, यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



