Iravati Marathi Movie : नात्यांची गोष्ट, रहस्याची जोड; ‘इरावती’ चित्रपट 12 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : नाती, प्रेम, आपुलकी आणि विश्वास यांसोबतच रहस्याची गुंफण असलेली कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चिन्मय प्रॉडक्शन प्रस्तुत ‘इरावती’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, हा चित्रपट 12 फेब्रुवारी 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश देशपांडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, डॉ. दिनेश वैद्य यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
नात्यांमधील भावविश्व उलगडणार
काही नाती जन्माने जोडली जातात, तर काही प्रेम, माया आणि विश्वासाच्या बंधातून निर्माण होतात. आयुष्याच्या प्रवासात जुळणाऱ्या अशाच नात्यांची गोष्ट ‘इरावती’मधून मांडण्यात येणार आहे. नात्यांमधील भावभावना आणि त्यामागे दडलेली रहस्यं यांची सांगड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनुभवी कलाकारांची फळी
‘इरावती’मध्ये सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी आणि तरुण कलाकारांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
निर्माते डॉ. दिनेश वैद्य यांच्या मते, ‘इरावती’ ही केवळ चित्रपटाची कथा नसून माणसांमधील नात्यांचा आणि भावबंधांचा शोध घेणारा अनुभव आहे. प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा आशय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिग्दर्शक निलेश देशपांडे यांनीही प्रत्येक नात्यामागील भावना, ओढ आणि माणसांना जोडणाऱ्या अदृश्य धाग्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचं सांगितलं.
तांत्रिक टीमही दमदार
चित्रपटाची कथा डॉ. दिनेश वैद्य यांची असून, पटकथा नंदू परदेशी यांनी लिहिली आहे. संवादलेखन डॉ. दिनेश वैद्य आणि नंदू परदेशी यांनी केलं आहे. छायाचित्रण अनिकेत के, संकलन सुबोध नारकर आणि संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमकर यांचं आहे.नात्यांमधील भावविश्व आणि रहस्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘इरावती’ हा चित्रपट 12 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.



