मनोरंजन

Aadi Anant Teaser : ‘आदि अनंत’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या नात्याची हळवी गोष्ट

पंकज राणे

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा कौटुंबिक नात्यांची भावस्पर्शी गोष्ट पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती आणि नव्या पिढीतील सदस्य यांच्यातील प्रेम, आपुलकी आणि भावनिक बंध उलगडणाऱ्या आगामी ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून आजोबा आणि नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आजोबा आणि नातवाच्या नात्याची भावस्पर्शी गोष्ट

आजोबा आणि नातवाचं नातं हे प्रेम, संस्कार आणि निरागस आठवणींनी जोडलेलं असतं. या नात्यातील माया, लहानसहान कुरबुरी आणि एकमेकांना दिलेला भावनिक आधार यांचं चित्रण ‘आदि अनंत’मध्ये करण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि कुटुंबातील जिव्हाळ्याच्या नात्यांची पुन्हा एकदा आठवण करून देणार आहे.

दिग्दर्शक महेश लिमये यांनी या चित्रपटातून आजोबा आणि नातवामधील नातं सहज, सुंदर आणि भावनिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटावं आणि मनात जुन्या आठवणी जाग्या व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दमदार कलाकारांची फळी

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत.अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

12 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार

निर्मात्यांच्या मते, ‘आदि अनंत’ हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून अनुभवता येईल असा मनोरंजक चित्रपट आहे. नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला कितपत भावतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘आदि अनंत’ येत्या 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Back to top button