Khagras Marathi Movie Motion Poster Out :‘खग्रास’चे मोशन पोस्टर प्रदर्शित; दमदार कलाकारांची फौज

पंकज राणे
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका रहस्यपटाची भर पडणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘खग्रास’चे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यातील गूढ वातावरण आणि लक्षवेधी ओळींनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ‘जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो, तेव्हा सावली रक्ताने भरते’ या ओळी चित्रपटातील रहस्याची झलक दाखवतात. हा चित्रपट 5 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
दमदार कलाकारांची मांदियाळी
‘खग्रास’मध्ये सिद्धार्थ मेनन, संस्कृती बालगुडे, क्षितीश दाते, स्वानंदी टिकेकर, राहुल पेठे, सायली पाठक, अनन्या जावळे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांची एकत्रित फळी हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, व्यक्तिरेखांमध्ये कोणते संबंध आहेत आणि कथेमागे कोणते रहस्य दडले आहे, याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे.
देवेश व्ही. कामत यांचे लेखन आणि दिग्दर्शन
आकाश पेंढारकर आणि पराग मेहता प्रस्तुत करत असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देवेश व्ही. कामत यांनी केले आहे. राकेश जावळे, किरण जावळे, कीर्ती जावळे आणि आशुतोष शर्मा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर स्वप्नेश सावंत, फ्लाइंग बुलेट पिक्चर्स आणि शोटॅड मोशन पिक्चर्स सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शक देवेश व्ही. कामत यांच्या मते, रहस्यपटात प्रेक्षकांना प्रत्येक टप्प्यावर विचार करायला लावणं महत्त्वाचं असतं. कथा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारं गूढ यांचा योग्य मेळ साधण्याचा प्रयत्न ‘खग्रास’मधून करण्यात आला आहे.
चित्रपटाचे निर्माते राकेश जावळे यांनीही या वेगळ्या धाटणीच्या रहस्यपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मोशन पोस्टरमुळे निर्माण झालेली उत्सुकता आता चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत कायम राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.



