मनोरंजन

नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना महापालिकेची महासभेत श्रद्धांजली…

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना मंगळवारी मुंबई महापालिकेच्या महासभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. कला, संस्कृती आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत नगरसेवकांनी आठवणींना उजाळा दिला. नाना पाटेकर यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह रंगभूमी, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना शोकप्रस्तावात व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अभिनयाचा ठसा आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य कायम स्मरणात राहील, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी नाना पाटेकर आणि मधु कांबीकर यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. आपल्या कार्यातून समाजमनावर प्रभाव पाडणारे हे दोन्ही कलाकार कायम स्मरणात राहतील, असे त्यांनी नमूद केले. प्रस्तावाला अनुमोदन देताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नाना पाटेकर यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा, अभिनयातील वैशिष्ट्यांचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव केला.

शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनामुळे एक चांगला मित्र आणि सल्लागार गमावल्याची भावना व्यक्त केली. नानांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला. ते परखडपणे आपले मत मांडणारे व्यक्तिमत्त्व होते, असे नगरसेविका श्रद्धा जाधव म्हणाल्या. नाना पडद्यावर साकारत असलेल्या भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही तत्त्वनिष्ठ होते, असे भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी सांगितले.

नाना पाटेकर यांचा तापट स्वभाव अनेकांना परिचित असला, तरी त्यांच्यातील संवेदनशीलता आणि मायाळूपणा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामातून दिसून आला, असे यामिनी जाधव यांनी नमूद केले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.

नानांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार द्या
नाना पाटेकर यांचा रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास विलक्षण होता. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात यावा, अशी चाहत्यांची भावना असल्याचे मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी नाना पाटेकर यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची आठवण सांगितली. नानांना सुमारे दीड कोटी रुपयांची कार खरेदी करायची होती; मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत समजल्यानंतर त्यांनी कारसाठी राखून ठेवलेली रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी दिल्याची आठवण आझमी यांनी सांगितली.

अभिनयातील वेगळेपण, स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक बांधिलकी यांमुळे नाना पाटेकर यांनी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले. तर मधु कांबीकर यांनी लोककलेच्या माध्यमातून मराठी सांस्कृतिक परंपरेला वेगळी ओळख मिळवून दिली. या दोन्ही ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाला महापालिकेच्या महासभेत अभिवादन करण्यात आले.

मधु कांबीकर यांच्या लोककलेतील योगदानाचा गौरव
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेला आणि लोकपरंपरेला व्यापक ओळख मिळवून देण्यात ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि लोककलांशी असलेल्या नात्याने त्यांनी मराठी कला-संस्कृतीच्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले. ग्रामीण जीवन, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मातीशी जोडलेली त्यांची कलासाधना रसिकांच्या स्मरणात कायम राहील.

मधु कांबीकर यांनी आपल्या अभिनयातून मराठी लोकजीवनातील विविध पैलू प्रभावीपणे उलगडले. लोककलेची परंपरा जपत ती रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीसह लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाला आणि मराठी संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाला महापालिकेच्या महासभेत श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Back to top button