कॉफी विथ करणमध्ये व्हर्जिनिटीच्या प्रश्नावर सलमान खानचे भन्नाट उत्तर; सीझन ९ च्या पहिल्याच भागात भाईजानची तुफान फटकेबाजी…
मुंबई: करण जोहरचा बहुचर्चित आणि लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ आपल्या अंतिम सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सीझन ९ च्या पहिल्याच भागात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान धमाकेदार एन्ट्री करणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या टीझरमध्ये सलमान आणि करण यांच्यातील खुमासदार संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सलमानने केवळ करणच्या होस्टच्या खुर्चीवर ताबाच मिळवला नाही, तर जुन्या वादग्रस्त मुद्द्यांवर आणि वैयक्तिक प्रश्नांवरही आपल्या खास शैलीत उत्तरे दिली आहेत.
टीझरच्या सुरुवातीला करण जोहर सांगतो की, या अंतिम पर्वाची सुरुवात करण्यासाठी सलमान खानपेक्षा उत्तम पर्याय दुसरा कोणी असूच शकत नाही. यावर सलमान मिश्किल अंदाजात थेट करण जोहरच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि या शोचे नाव बदलून ‘कॉफी विथ सलमान’ करूयात असे म्हणतो. करण जेव्हा सांगतो की हा या शोचा शेवटचा सीझन असून तो पुन्हा येणार नाही, तेव्हा सलमान मस्करीत त्याला म्हणतो, “करण, तुस्सी ना जाओ.”
व्हर्जिनिटीच्या प्रश्नावर सलमानचा पंच
यापूर्वीच्या एका सीझनमध्ये सलमानने आपण अजूनही ‘व्हर्जिन’ असल्याचा दावा केला होता. त्याच वक्तव्याची आठवण करून देत करणने सलमानला पुन्हा छेडले आणि विचारले, “तू अजूनही व्हर्जिन आहेस का?” हा प्रश्न ऐकताच सलमानने हसून उत्तर दिले, “कंट्रोल यार ब्रदर, कंट्रोल!” सलमानची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पापाराझी आणि गिफ्ट हॅम्परवर टोमणा
अभिनेत्रींचे चुकीच्या अँगलने फोटो काढल्याबद्दल सलमान खानने काही दिवसांपूर्वी पापाराझींवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्या प्रसंगाचा संदर्भ देत सलमानने टीझरमध्ये म्हटले की, “ज्याने कोणी फोनमध्ये हा कॅमेरा बनवला आहे, तो ज्या दिवशी मला सापडेल…”
शोच्या प्रसिद्ध गिफ्ट हॅम्परबद्दल बोलताना सलमानने हलक्याफुलक्या अंदाजात म्हटले की, तो गिफ्ट हॅम्पर जिंकण्यासाठी नाही तर केवळ लाड पुरवून घेण्यासाठी (पॅम्पर्ड होण्यासाठी) इथे आला आहे. भाईजानचा हा बिनधास्त अंदाज पाहून सीझन ९ च्या पहिल्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



