गुहागरमध्ये उभारणार ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प?

मुंबई : कोकणातील चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालशेत येथील सुमारे १२५ एकर शासकीय जागेचा उपयोग करून हा प्रकल्प विकसित करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे पर्याय तपासून महिनाभरात प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकणात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पालशेतसह वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा उपयोग करून चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याची सूचनाही त्यांनी मांडली.
गुहागर आणि दापोली तालुक्यांतील निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अनुकूल आहेत. या परिसरात यापूर्वी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत मिळण्यात अडचणी येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. एकाच ठिकाणी चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास निर्मात्यांना सोयीचे होईल आणि कोकणातील चित्रपट निर्मितीलाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पीपीपी तत्त्वावर सुविधा विकसित करण्याचा विचार
पालशेत येथील पर्यटन विभागाच्या मालकीच्या सुमारे १२५ एकर जागेवर पर्यटन आणि चित्रपट उद्योगाला पूरक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून या सुविधा उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. एमटीडीसीसोबत संयुक्त उपक्रम राबविण्याबरोबरच चित्रपट पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासाठी म्हाडाची मदत घेण्याच्या पर्यायाचाही विचार करण्याचे निर्देश शेलार यांनी दिले.
हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास चित्रपट निर्मितीसोबतच पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रकल्पाचे स्वरूप, निधीची तरतूद आणि अंमलबजावणी याबाबतचा अंतिम निर्णय सविस्तर प्रस्तावानंतर स्पष्ट होणार आहे.
या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. विनय नातू दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.



