मुंबई

इथेफॉनने पिकवलेली १,३९४ किलो केळी जप्त…

मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी तुर्भे फळबाजारात इथेफॉन रसायनाचा थेट वापर करून कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. या कारवाईत १,३९४ किलो केळी, अंदाजे ६७ हजार ८१४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफडीएच्या कोकण विभागाला फळे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचांसह एपीएमसी फळ बाजारातील सेक्टर-१९ येथील गाळा क्रमांक एन-९१९ येथे तपासणी केली. त्यावेळी एका कामगाराकडून BTHILEX (इथेफॉन ३९ टक्के एसएल) या वनस्पती वाढ नियामकाच्या द्रावणात केळी बुडवून पिकविली जात असल्याचे आढळले.

विक्रेत्याने पाच लिटर पाण्यात रसायनाची दोन झाकणे मिसळून केळी पिकविण्यासाठी द्रावण तयार केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सुंदरी १९८ किलो, एलायची ४९८ किलो आणि खट्टा मीठा ६९८ किलो असा एकूण १,३९४ किलो केळीचा साठा जप्त करण्यात आला. केळीचे तीन कायदेशीर नमुने तसेच रसायनमिश्रित द्रावणाचा सर्वेक्षण नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, जप्त केलेल्या रसायनाच्या वेष्टनावरील उत्पादकाचा पत्ता, पिनकोड आणि संपर्क क्रमांक संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तसेच त्यावर केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीचा (CIB&RC) नोंदणी क्रमांकही नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे हे रसायन बनावट किंवा अनोंदणीकृत असण्याची शक्यता असून, त्याबाबत कीटकनाशक कायद्यानुसार पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाकडे संदर्भ देण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६, भारतीय न्याय संहिता आणि कीटकनाशक कायद्यातील संबंधित कलमांनुसार प्रकरणाचा तपास सुरू आहे. अन्न विश्लेषकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.

इथेफॉनचा थेट वापर प्रतिबंधित

फळे पिकविण्यासाठी इथेफॉनसारख्या रसायनांचा थेट द्रावणाच्या स्वरूपात वापर करून फळे त्यात बुडविणे प्रतिबंधित आहे. फळे पिकविण्यासाठी विहित पद्धतीने इथिलीन वायूचा वापर करण्यास परवानगी आहे. एफडीएने अशा प्रकारे कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याच्या गैरप्रकारांविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे.

दूध भेसळीविरोधातही कारवाई

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे दूध भेसळीप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासणीत दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण १६ हजार ७३० लिटर दूध, सुमारे ६ लाख ६९ हजार २०० रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला.

महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथील ७,६३४ लिटर आणि डेलीविश अँग्रो डेअरी प्रॉडक्ट्स येथील ९,०९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले. दोन्ही प्रकरणांत माळशिरस पोलिस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावरही धडक

मुंबई आणि कोकण विभागात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी २९ लाख ४४ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई विभागात ३ आस्थापनांवर कारवाई करून ३१.१४ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, तीन एफआयआर दाखल करून तीन जणांना अटक करण्यात आली.

पालघरमध्ये चरोती टोलनाक्यावर ६३.५० लाख रुपये आणि वसईतील खाडीनवडे टोलनाक्यावर ३४.८० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि वाहने जप्त करण्यात आली.

११ हॉटेल-रेस्टॉरंटवर कारवाई

मुंबई विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि बेकरी आस्थापनांच्या तपासणीत अन्नसुरक्षा, स्वच्छता, साठवणूक आणि दस्तऐवजीकरणातील त्रुटी आढळल्या. त्यामुळे ११ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, ८ आस्थापनांचे परवाने आणि ३ आस्थापनांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.

एफडीएने नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा एफडीएच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button