बाणगंगा तलावात धार्मिक विधींना बंदी घाला…

मुंबई : धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलाव परिसरात पिंडदान, तर्पण, केस कापणे यांसह कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करण्यास बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. येत्या ९ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या असल्याने बाणगंगा परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मनसेचे मलबार हिल विधानसभा विभागाध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आणि जीएसबी ट्रस्टकडे केली आहे.
मनसेच्या म्हणण्यानुसार, पितृपक्षाच्या काळात बाणगंगा तलावात पिंडदान, तर्पण आणि इतर धार्मिक विधी केले जातात. या विधींमध्ये विविध वस्तू तलावाच्या पाण्यात सोडल्या जात असल्याने जलप्रदूषण होत असून, त्याचा तलावातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन दिवसांपूर्वी बाणगंगा तलावात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आल्याचा दावाही मनसेने केला आहे. या घटनेची कारणमीमांसा करून प्रदूषणाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मनसेने पत्रात बाणगंगा तलावाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले आहे. स्थानिक नागरिकांसाठी गणेश विसर्जनास पर्यावरणाच्या कारणास्तव निर्बंध असताना धार्मिक विधींमधून होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
धार्मिक विधी करणाऱ्या नागरिकांच्या भावनांचा आदर असल्याचे स्पष्ट करत, अशा विधींसाठी प्रशासनाने बाणगंगा तलावाजवळील समुद्रकिनारी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी बाणगंगा परिसरात धार्मिक विधींना परवानगी देऊ नये आणि भविष्यातही सांस्कृतिक कार्यक्रम वगळता अन्य धार्मिक विधींना प्रतिबंध करावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
लोढांवर मनसेचा गंभीर आरोप
दरम्यान, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका बैठकीत बाणगंगा येथे पिंडदानाचे विधी करणाऱ्या पुजाऱ्यांना बोलावल्याचा दावा मनसेने केला आहे. तसेच बाणगंगा येथे धार्मिक विधी करणारे आणि करवून घेणारे नागरिक प्रामुख्याने उत्तर भारतातून येतात, असा दावा करत मनसेने लोढा यांच्यावर उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी या विधींना पाठबळ दिल्याचा आरोप केला आहे.
बाणगंगा हे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असल्याने त्याच्या पर्यावरणीय आणि ऐतिहासिक संवर्धनाला प्राधान्य मिळाले पाहिजे. मात्र, राजकीय हितसंबंधांमुळे तलावाच्या पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांना पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने धार्मिक विधींवर बंदी घालण्याची मागणी मान्य न केल्यास मनसेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे.



