जी.टी.बी. नगर पुनर्विकासाला वेग; १ नोव्हेंबरपासून भाडे

१,२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार; पात्र व सशर्त पात्र अनिवासी गाळेधारकांना १० हजार रुपये
मुंबई: शीव कोळीवाडा येथील गुरु तेग बहादूर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी म्हाडाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पातून निष्कासित करण्यात आलेल्या १,२०० पात्र निवासी सदनिकाधारकांना १ नोव्हेंबर २०२६ पासून दरमहा २० हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. तसेच पात्र ठरलेल्या अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे मिळणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ३५६ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी म्हाडाने सुधारित प्रारूप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार १२१ धारक पूर्णपणे पात्र, १९६ धारक सशर्त पात्र, तर ३९ धारक अपात्र ठरले आहेत.
सशर्त पात्र ठरलेल्या १९६ धारकांना पात्रता सिद्ध करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कायदेशीर कागदपत्रे म्हाडाकडे सादर करून पात्रता सिद्ध करणे बंधनकारक राहणार आहे. कागदपत्रांची छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच पात्रता निश्चिती प्रक्रियेसाठी संबंधित गाळेधारकांना BESTची प्रलंबित वीज देयके भरणेही आवश्यक राहणार आहे.
जी.टी.बी. नगर हा म्हाडाच्या माध्यमातून C&D एजन्सीमार्फत राबविण्यात येत असलेला म्हाडाचा पहिला पुनर्विकास प्रकल्प आहे. पुनर्विकासात १,२०० लाभार्थ्यांसाठी ३९ ते ४८ मजली तीन आधुनिक निवासी टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत फंजिबलसह किमान ४.५ चटई क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक सुविधांनी युक्त सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (CC) प्राप्त झाल्यानंतर पात्र निवासी लाभार्थ्यांना दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्यात येईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे इमारतींची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडाकडून पार पाडली जाणार आहे.
गेटेड कम्युनिटीच्या संकल्पनेनुसार प्रकल्पात बहुमजली बेसमेंट आणि पोडियम स्तरांवर वाहनतळाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



