मेट्रो-१ला अतिरिक्त डबे जोडणार:प्रवास सुकर होणार ,गर्दीचा ताण कमी होईल

मुंबई : मुंबईतील पहिली प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली मेट्रो वन ही आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रो-१ मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी आत्ता धावणाऱ्या चार डब्यांच्या मेट्रोला अजून दोन डबे जोडण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने अतिरिक्त २२ डबे ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वर्सोवा-घाटकोपरदरम्यान धावणाऱ्या मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याबरोबरच अन्य मेट्रो मार्गिकांशीही जोडली गेल्याने प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे या मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने अतिरिक्त डबे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या धावणाऱ्या चार डब्यांच्या मेट्रो ट्रेनचे सहा डब्यांच्या ट्रेनमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. डब्यांची खरेदी मूळ निर्मात्यांच्या तांत्रिक मदतीने केली जात आहे. हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, अशी माहिती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली.
मेट्रो-१ मार्गावरील ट्रेनमध्ये दोन अतिरिक्त डबे जोडल्यानंतर तिची प्रवासी क्षमता सुमारे ५० टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या चार डब्यांच्या ट्रेनमधून एका फेरीत सुमारे १,१७८ प्रवासी प्रवास करू शकतात. सहा डब्यांची ट्रेन झाल्यानंतर ही क्षमता १,७९२ प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे.
त्यामुळे प्रत्येक फेरीत सुमारे ६१४ अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.भुयारी मेट्रो मार्गिका, यलो लाइन-२ए आणि रेड लाइन-७ सुरू झाल्याने मेट्रो-१च्या प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे. अंधेरी आणि घाटकोपर या प्रमुख स्थानकांबरोबरच मरोळ नाका आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी वाढत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांचा ताण नियंत्रित करण्याचे आव्हान मेट्रो प्रशासनासमोर आहे. अतिरिक्त डबे जोडल्यामुळे या गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, मेट्रो-१ मार्गावरील स्थानकांचे प्लॅटफॉर्म यापूर्वीच सहा डब्यांच्या ट्रेनसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त डबे जोडण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या रचनेत मोठे बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही.



