BMC मुंबई महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीवर प्रश्नचिन्ह; सरकारी विभागांकडे कोट्यवधींची थकबाकी

मनोज कुळकर्णी
मुंबई – मुंबईकरांकडून पाणीपट्टीची वसुली करण्यासाठी महापालिकेचा सातत्याने आग्रह; मात्र ज्या सरकारी यंत्रणांकडून कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे, त्यांच्याकडेच वसुलीचा हात आखडता घेतला जातो का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मुंबईला दररोज सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी तब्बल शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या थकबाकीत राज्य आणि केंद्र सरकारसह एमएमआरडीए, बेस्ट आणि विविध सरकारी विभागांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांकडून पाणीपट्टी वसुलीचा आग्रह धरणाऱ्या महापालिकेची सरकारी विभागांकडील थकबाकी वसुली नेमकी किती प्रभावी आहे, यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेकडून मुंबई शहराला दररोज सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीची थकबाकी वसूल करणे महापालिकेसाठी महत्त्वाचे असताना सरकारी यंत्रणांकडील थकीत रक्कम मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
उपलब्ध माहितीनुसार, राज्य सरकारकडे तब्बल २१६ कोटी ६ लाख ८ हजार रुपये, तर केंद्र सरकारकडे ८० कोटी १५ लाख ७४ हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. एमएमआरडीएकडे २३ कोटी ३० लाख ९० हजार रुपये, तर बेस्ट उपक्रमाकडे ४३ कोटी ७४ लाख ८१ हजार रुपये थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय अन्य विभागांकडे ४६ कोटी ७७ लाख रुपये आणि महापालिकेच्या विविध यंत्रणांकडे ५० कोटी ८६ लाख रुपये थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारी विभागांकडील या थकबाकीमुळे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांकडून पाणीपट्टीची नियमित वसुली करण्याचा आग्रह धरताना सरकारी विभागांकडील थकीत रक्कमही प्रभावीपणे वसूल करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागांकडील थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे.



