मुंबई

गारगाई धरणाला जानेवारीचा मुहूर्त; २०२९च्या पावसाळ्यापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित गारगाई धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामाला जानेवारी २०२७पासून सुरुवात करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर काम सुरू होणार असून, २०२९च्या पावसाळ्यापर्यंत धरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. धरणाची मुख्य रचना अवघ्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान जलस्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेता गारगाई प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईला उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी उभारण्यात आलेल्या मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी सुमारे १५ महिन्यांचा कालावधी लागला होता. मध्य वैतरणा धरणातून सध्या मुंबईला दररोज सुमारे ४५५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्याच्या तुलनेत गारगाई धरणातून मिळणारा पाणीपुरवठाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. २०४१मध्ये मुंबईला दररोज सुमारे ६,४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नवीन जलस्रोत विकसित करण्यावर महापालिकेचा भर आहे.

गारगाई धरणाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दररोज ४४० दशलक्ष लिटरची भर पडणार असून, भविष्यातील पाणीगरज भागविण्यासाठी या प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Back to top button