मुंबई

मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी खुशखबर! २०२८ पर्यंत पूर्ण होणार नव्या टर्मिनसचे काम; गर्दीतून मिळणार मोठा दिलासा…

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमधील वाढती लोकसंख्या तसेच लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वाढत्या ट्रॅफिकच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ‘वसई रोड रेल्वे टर्मिनस’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. २०२८ पर्यंत हे नवे टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. रेल्वे प्रशासनाने विविध कंत्राटदारांची नियुक्ती करून प्रत्यक्ष कामाला गती दिली आहे. सुमारे १५०.२५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा प्रकल्प मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सद्यस्थिती
विस्तीर्ण परिसर आणि क्षमता: वसई रोड टर्मिनस प्रकल्प रेल्वेच्या सुमारे ४.५ हेक्टर जागेवर साकारला जात आहे. यामध्ये १.८ रूट किलोमीटर आणि ५.१ ट्रॅक किलोमीटरचे अत्याधुनिक रेल्वे नेटवर्क उभारले जाईल. हे नवीन टर्मिनस सुरू झाल्यावर एकाच वेळी १२ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या हाताळण्याची क्षमता या स्थानकामध्ये असेल.

कामाची प्रगती: नव्या टर्मिनससाठी प्रस्तावित १२०० मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मच्या भिंतींपैकी सुमारे ५०० मीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय काँक्रीट ॲप्रन, अत्याधुनिक ड्रेनेज यंत्रणा आणि यार्डमधील जुने ट्रॅक हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

जोगेश्वरी गुड्स यार्ड वसईत होणार स्थलांतरित
पश्चिम रेल्वेवर लोकल आणि प्रवासी गाड्यांची वाहतूक विनाअडथळा सुरू राहावी यासाठी जोगेश्वरी येथील मालगाड्यांचे ‘गुड्स यार्ड’ वसई रोड येथे स्थलांतरित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे यार्ड सुमारे ८५० मीटर लांब आणि २७ मीटर रुंद असेल. यामध्ये ८००-८०० मीटरच्या दोन स्वतंत्र गुड्स लाईन तयार केल्या जातील. दक्षिणेकडील भागात रॅम्प तसेच व्यावसायिक आणि प्रशासकीय इमारती उभारल्या जाणार आहेत, ज्यामुळे मालगाड्यांची वाहतूक प्रवासी मार्गांपासून पूर्णपणे वेगळी केली जाईल.

उपनगरातील प्रवाशांची धावपळ थांबणार
सध्या वसई-विरार, मीरा रोड, भाईंदर आणि पालघर पट्ट्यातील लाखो प्रवाशांना उत्तर भारत किंवा दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी वांद्रे टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल किंवा थेट सीएसएमटी (CSMT) पर्यंत लांबचा प्रवास करावा लागतो. वसई टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर या प्रवाशांना आपल्या घराच्या जवळूनच थेट एक्स्प्रेस गाड्या पकडणे शक्य होईल.

लोकल फेऱ्या वाढण्यास होणार मदत
सध्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमुळे बोरिवली ते विरार दरम्यानच्या लोकल सेवांवर मोठा परिणाम होतो. अनेकदा लोकल गाड्या रखडतात किंवा उशिराने धावतात. वसई येथे स्वतंत्र टर्मिनस सुरू झाल्यानंतर लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणात (Punctuality) मोठी सुधारणा होईल आणि भविष्यात नव्या लोकल फेऱ्या सुरू करणेही रेल्वे प्रशासनाला सोपे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button