विकसित भारताच्या वाटचालीत मुंबईचे योगदान अग्रणी राहील : अमीत साटम…

मुंबई, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असताना या प्रवासात मुंबईचे योगदान अग्रणी राहील, असा विश्वास भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला. मुंबईतील बदलत्या पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना यावा, तसेच विकासकामांची माहिती डिजिटल माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सेवा संकल्प अभियान आणि ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित या दौऱ्यात सहभागी इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सनी मुंबईतील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबईची वाहतूक व्यवस्था, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाचे नियोजन याबाबत त्यांना माहिती देण्यात आली.
मुंबईच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडताना साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित प्रश्नांवर भविष्यातील नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या ‘स्पिरिट’चा उल्लेख करताना साटम म्हणाले की, संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही मुंबईची खरी ताकद आहे. २६ जुलैच्या पुराच्या वेळी मुंबईकरांनी एकमेकांना केलेली मदत हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.मुंबईकरांच्या हक्काच्या घराच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. वरळी आणि शिवडी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा संदर्भ देताना पुनर्विकासाच्या माध्यमातून मूळ रहिवाशांना त्याच परिसरात हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.
भारतीय संस्कृती आणि सण-उत्सवांच्या परंपरेचा उल्लेख करताना देशात वर्षभर विविध सण साजरे होतात. या परंपरांमुळे समाजातील परस्परांची बांधिलकी आणि सामाजिक एकजूट टिकून राहते, असे साटम यांनी सांगितले.

सिद्धिविनायक दर्शनाने दौऱ्याला सुरुवात
‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ची सुरुवात प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दर्शनाने झाली. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाचे कोषाध्यक्ष तथा भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी सहभागी इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सचे स्वागत केले.
त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानकातून अॅक्वा लाईनने चर्चगेटपर्यंत प्रवास करण्यात आला. पुढे अटल सेतूमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयालाही भेट देण्यात आली.
दौऱ्याचा अंतिम टप्पा कोस्टल रोडमार्गे वरळी प्रोमेनेड येथे झाला. येथे आमदार साटम यांच्यासोबत विशेष टॉक शो आणि संवादाचे आयोजन करण्यात आले. मुंबईतील विकासकामे, त्यांचा नागरिकांना होणारा लाभ, बदलती पायाभूत रचना आणि भविष्यातील विकासाची दिशा याबाबत त्यांनी सहभागी इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सशी संवाद साधला.
भाजपा मुंबईचे सचिव तथा नगरसेवक प्रतिक कर्पे आणि भाजपा मुंबई सोशल मीडिया संयोजक नचिकेत सहस्त्रबुध्दे यांच्या समन्वयाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव डिजिटल माध्यमांतून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.



