मुंबई

मुंबईत एक लाख नवीन झाडांचे उद्दिष्ट; गृहनिर्माण संस्थांना वृक्षलागवडीस प्रोत्साहन द्या

मुंबई : मुंबईतील वाढते नागरीकरण आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी गृहनिर्माण संस्था तसेच खासगी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीला प्रोत्साहन देऊन एक लाख नवीन झाडांचे उद्दिष्ट निश्चित करावे, अशी मागणी सभागृह नेते आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य गणेश खणकर यांनी केली.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत खणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच याबाबत लेखी मागणीही केली. मुंबईत नवीन वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा उपलब्ध नसल्याने खासगी जागांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईत सुमारे ४५ हजार गृहनिर्माण संस्था आणि १५ हजार खासगी इमारती असल्याचा दाखला देत, प्रत्येक संस्था अथवा इमारतीच्या परिसरात किमान एक ते दोन झाडे लावण्यास प्रोत्साहन दिल्यास शहरात सुमारे एक लाख नवीन झाडे लावणे शक्य होईल, असा मुद्दा खणकर यांनी मांडला. विकास प्रकल्पांमध्ये अपरिहार्य कारणास्तव होणारी वृक्षतोड भरून काढण्यासाठी केवळ महापालिकेच्या जागांवर अवलंबून न राहता खासगी परिसरातील उपलब्ध जागांचाही वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

वृक्षछाटणीसाठी विशेष सुविधा द्या

गृहनिर्माण संस्था वृक्षलागवडीसाठी सकारात्मक असल्या तरी झाडांच्या धोकादायक किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची वेळोवेळी छाटणी करताना त्यांना अडचणी येतात. महापालिकेकडून वेळेत छाटणी न झाल्यास संस्थांना खासगी पातळीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाला अपेक्षित चालना मिळत नसल्याचे खणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

गृहनिर्माण संस्था व खासगी इमारतींच्या परिसरातील झाडांची नियमित तसेच धोकादायक परिस्थितीत तातडीने छाटणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करून विशेष सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे संस्थांवरील आर्थिक भार कमी होऊन अधिकाधिक संस्था वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय सदस्यांचा एकमुखी पाठिंबा

खणकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीतील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविला. मुंबईच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाबाबत दिवाळीपूर्वी सकारात्मक निर्णय घेऊन मुंबईकरांना ‘हरित दिवाळी’ची भेट द्यावी, अशी अपेक्षाही सदस्यांनी व्यक्त केली.

आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद

या विषयावर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे खणकर यांनी सांगितले. त्यामुळे गृहनिर्माण संस्था आणि खासगी इमारतींच्या सहभागातून मुंबईत व्यापक वृक्षलागवड मोहीम राबविण्याच्या दिशेने पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईला अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि राहण्यायोग्य बनविण्यासाठी ‘प्रत्येक इमारतीत किमान एक झाड’ या संकल्पनेला चालना देत एक लाख नवीन झाडांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिकेने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी खणकर यांनी केली.

Related Articles

Back to top button