Women Land Rights : ‘महिलांना कृषी जमिनीवर मालकी हक्क द्या’; विजया रहाटकर…

मुंबई : महिलांचे खरे सक्षमीकरण करायचे असेल तर त्यांना केवळ वारसा आणि संपत्तीतील हक्क देऊन चालणार नाही, तर कृषी जमिनीवर मालकी हक्क आणि कृषी संसाधनांशी संबंधित निर्णय प्रक्रियेतही सहभाग मिळणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवारी सांगितले.
महिलांशी संबंधित राज्यातील कायदे आणि धोरणांचा आढावा घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील देवनार येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Consultation on Review of State-Specific Laws’ या विषयावर हा परिसंवाद झाला.
महिलांच्या वारसा आणि संपत्तीच्या हक्कांबरोबरच कृषी जमिनीवरील मालकी, शेतकरी आत्महत्यांनंतर विधवा महिलांची परिस्थिती, कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि महिलांना न्याय मिळवून देण्यातील अडचणी यावर रहाटकर यांनी भाष्य केले. कृषी क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग असूनही जमीन आणि संसाधनांवरील मालकीच्या बाबतीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांना जमिनीची मालकी आणि कृषीविषयक निर्णयांमध्ये सहभाग मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिसंवादात महिलांशी संबंधित कायदे अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सूचना मांडल्या. कायदे तज्ज्ञ, विधिज्ञ, पोलीस, न्यायव्यवस्था, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅरा-लीगल स्वयंसेवक सहभागी झाले होते.
पहिल्या सत्रात महिलांचे मालमत्ता आणि कृषी जमिनीवरील हक्क या विषयावर अॅड. पुनीत चतुर्वेदी आणि अॅड. रुपाली गोठवाल यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात पालक व ज्येष्ठ नागरिकांचे भरणपोषण व कल्याण अधिनियम, २००७ याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण कुंभोजकर आणि TISSच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सोनाली कुसुम यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, TISSच्या स्कूल ऑफ लॉ, राईट्स अँड कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्सचे प्रा. अरविंद तिवारी, TISSचे निबंधक डॉ. नरेंद्र मिश्रा, वरिष्ठ विधिज्ञ रवींद्र पांजणकर, मुकुल चितळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.



