मुंबई

MPSC Protest Row : रोहित पवारांच्या आंदोलनात विद्यार्थी नव्हे, भाडोत्री कार्यकर्ते; भाजपचा व्हिडीओ दाखवत गंभीर आरोप

मुंबई : आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू असलेले आंदोलन हे एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून राजकीय स्टंट असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पुण्याबाहेरील कार्यकर्त्यांच्या महागड्या गाड्या आल्याचा दावा करत बन यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ दाखवले.

गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, सुरुवातीच्या चार दिवसांत विद्यार्थी आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे रोहित पवार यांनी फोन करून पुण्याबाहेरील कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी बोलावले, असा आरोप बन यांनी केला. यामध्ये बारामती ॲग्रो आणि साखर कारखान्यातील कर्मचारीही असल्याचा दावा त्यांनी केला.

200 ते 250 गाड्या आंदोलनस्थळी?

आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी पुणे आणि बारामतीबाहेरील कार्यकर्त्यांना आणण्यात आले. राजकीय पक्षांचे झेंडे आणि स्टिकर असलेल्या सुमारे 200 ते 250 गाड्या आंदोलनस्थळी आल्याचा दावा भाजपने केला. ही गर्दी पैसे देऊन जमवण्यात आल्याचा आरोपही बन यांनी केला.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीवर भाजपचा सवाल

रोहित पवार आता एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, पेपरफुटी त्यांच्या कार्यकाळात झालेली नाही. या प्रकरणात सहा जणांना अटक झाली असून, संबंधित सचिवाची बदलीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शिष्टमंडळांशी चर्चा केली असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मग रोहित पवार अजूनही आंदोलन का करत आहेत, असा सवाल बन यांनी उपस्थित केला.

ओमराजे निंबाळकरांच्या विरोधातील घोषणांवरही टीका

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आंदोलनस्थळी गेले असता त्यांच्याविरोधात ‘परत जा’, ‘गद्दार’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा विद्यार्थ्यांनी नव्हे, तर रोहित पवार, काँग्रेस आणि संजय राऊत यांच्या काही कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप बन यांनी केला.

ओमराजे निंबाळकर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते, तर त्यांच्याकडे एमपीएससीच्या मागण्या का मांडल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे आंदोलनात विद्यार्थी कमी आणि राजकीय कार्यकर्त्यांचीच संख्या अधिक असल्याचा दावा बन यांनी केला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरही काँग्रेसवर निशाणा

मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरही बन यांनी टीका केली. एकाही आदिवासी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक किंवा ताब्यात घेतले नसल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचेही बन म्हणाले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण न करता त्यांच्या भवितव्याचा विचार करावा. काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राजकारण करावे; विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये, अशी टीकाही त्यांनी केली.

रोहित पवारांचे आंदोलन हे विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हणत नवनाथ बन यांनी आंदोलनाच्या गर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Related Articles

Back to top button