मुंबई

बांद्रा पूर्वेत ८ फूट अजगराची थरारक सुटका; दीड-दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू

कलानगरमधील झोपडपट्टीत लोखंडी खांबातील पाईपमध्ये लपला होता अजगर; सर्पमित्रांच्या कौशल्याने सुरक्षित बचाव

मुंबई : बांद्रा पूर्वेतील कलानगर परिसरात रस्त्यालगतच्या झोपडपट्टीत सुमारे ८ फूट लांबीचा भारतीय अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र अतुल कांबळे आणि पोलीस सर्पमित्र सचिन मोरे यांना माहिती दिली. त्यानंतर तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अजगराची सुरक्षित सुटका करण्यात आली.

अजगर आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र अतुल कांबळे यांनी आंधेरी राऊंड हद्दीतील बांद्रा राऊंडचे राऊंड ऑफिसर दीपक दादा गायकवाड तसेच संबंधित मुंबई रेंज कंट्रोल रूमला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागरिकांनी अजगर घरांच्या आसपास फिरत असल्याचा व्हिडीओ सर्पमित्रांना दाखवला.

दरम्यान, नागरिकांची गर्दी आणि परिसरातील कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे अजगर जवळच ठेवलेल्या लोखंडी स्पेअर लाईटच्या खांब्यातील पाईपमध्ये जाऊन लपला होता. अजगराला इजा होऊ नये तसेच रेस्क्यू मोहीम सुरक्षितपणे पार पाडता यावी, यासाठी लोखंडी खांब उचलून मोकळ्या जागेत आणण्यात आला.

यानंतर पाईपमध्ये अडकलेल्या अजगराला बाहेर काढण्यासाठी दीड ते दोन तास प्रयत्न करण्यात आले. अखेर अजगर बाहेर येताच पोलीस सर्पमित्र सचिन मोरे यांनी कौशल्याने आणि सावधगिरीने त्याचा ताबा घेतला. अजगराची सुरक्षित सुटका होताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मागील महिन्यात याच परिसरात ११ फूट अजगराने मांजरीला ठार केल्याची घटना घडली होती. १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अजगरांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आजच्या रेस्क्यू मोहिमेकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते.

रेस्क्यू करण्यात आलेला अजगर हा अंदाजे ८ फूट लांबीचा भारतीय अजगर (Indian Rock Python) असून तो बिनविषारी आहे. भारतीय अजगर हा भारतात आढळणाऱ्या मोठ्या बिनविषारी सापांपैकी एक आहे.

वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि नियमानुसार या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात येणार आहे. अजगराची सुखरूप सुटका केल्याबद्दल नागरिकांनी सर्पमित्र अतुल कांबळे आणि पोलीस सर्पमित्र सचिन मोरे यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button