‘Matrushakti: पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत मुंबईत जनप्रतिनिधी मातृसंमेलन; ‘मातृत्वाच्या आव्हानां’वर होणार मंथन

प्रशांत गोडसे
मुंबई : कुटुंबाच्या जडणघडणीपासून समाज आणि राष्ट्रनिर्मितीपर्यंत मातृशक्तीची भूमिका अधोरेखित करणाऱ्या ‘स्त्री – परिवार की शक्ती से राष्ट्र की शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जनप्रतिनिधी मातृसंमेलनाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. विश्वमांगल्य सभेच्या वतीने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हे संमेलन होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतील जनप्रतिनिधींच्या कुटुंबातील मातृशक्ती या संमेलनात सहभागी होणार आहेत. मातृत्वभावना सशक्त करणे, संस्कारमूल्यांना बळ देणे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री वृषाली गोविंद जोशी यांनी दिली.
या संमेलनातील दुसऱ्या सत्रात ‘मातृत्वाची उपलब्धी आणि आव्हाने’ या विषयावर विशेष पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली आहे. ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या निर्मात्या रागिणी सोनाजी या या चर्चेतील प्रमुख पॅनलिस्टपैकी एक असणार आहेत. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील अनुभवासोबतच कुटुंब, मातृत्व आणि महिलांसमोरील बदलती आव्हाने या विषयांवर त्या संवाद साधणार आहेत.
या चर्चेत महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे, मफतलाल इंडस्ट्रीजच्या संचालक रुपल मफतलाल आणि विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली गोविंद जोशी सहभागी होणार आहेत. चर्चेचे सूत्रसंचालन कुलाबा प्रभाग क्रमांक २२५च्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर करणार आहेत.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये मुंबईच्या महापौर रितु तावडे, समाजसेविका मंजू लोधा, विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा नलिनी हावरे, राष्ट्रीय मार्गदर्शक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक प्रशांतजी हरताळकर, राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली गोविंद जोशी आणि मुंबई महानगर अध्यक्षा प्राची पंड्या यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मातृत्वाची बदलती भूमिका, महिलांसमोरील आजची आव्हाने, कुटुंबव्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीत मातृशक्तीचे योगदान या विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे



