१८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची महापौरांनी घेतली भेट

मुंबई : विमानातील सह-वैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही अतुलनीय धैर्य दाखवत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे फ्लाय दुबईचे कॅप्टन आणि मूळ मुंबईकर श्री. स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रविवारी भेट घेतली. घाटकोपर पूर्व येथील धवलगिरी इमारतीतील कॅप्टन मच्छार यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
कॅप्टन स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी महापौरांनी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच या कठीण प्रसंगी मच्छार कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण मुंबई उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे निवासस्थान असलेला प्रभाग क्रमांक १३२ हा महापौर रितू तावडे यांचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेला प्रभाग आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील या शूर मुंबईकराच्या कुटुंबीयांची भेट घेत महापौरांनी त्यांना पाठबळ दिले.
३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला. विमान सुमारे ३५ हजार फूट उंचीवर असताना सह-वैमानिकाकडून झालेल्या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संयम न गमावता विमानाचे यशस्वी आपत्कालीन लँडिंग केले आणि विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवले. या प्रवाशांमध्ये २७ बालकांचाही समावेश होता.
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी मच्छार कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या उपचारांची तसेच प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेची माहिती जाणून घेतली.
यावेळी आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.



