बाणगंगा तलावात पुन्हा मृत माशांचा खच

पिंडदानानंतर निर्माल्य तलावात टाकल्याने प्रदूषण होत असल्याचा आरोप; चौकशीची मनसेची मागणी
मुंबई : मलबार हिल येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आल्याने तलावाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावात वारंवार पिंडदानाचे विधी केले जातात. या विधीनंतर निर्माल्य तसेच अन्य पूजासाहित्य तलावात टाकले जात असल्याने पाणी दूषित होत असून त्याचा परिणाम माशांवर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.
जागरूक नागरिक संजय शिर्के यांनी यापूर्वीही या प्रकाराकडे वारंवार लक्ष वेधले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, बाणगंगा तलावाची देखभाल करणाऱ्या संबंधित यंत्रणांकडून तसेच महापालिकेकडून याबाबत ठोस आणि कडक उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, बाणगंगा तलावातील मृत माशांच्या प्रकाराची सखोल चौकशी करून पाणी दूषित होण्याची कारणे निश्चित करावीत, तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक मनसे शाखाध्यक्ष मुकुंद सुर्वे यांनी केली आहे. तलावाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



