एनसीएमसी कार्ड प्रकल्पाच्या कंत्राटदाराची क्षमता तपासा

प्रवासी, वाहकांच्या तक्रारींची दखल घेत श्रीरंग बरगे यांची निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रकल्प तांत्रिक अडचणी आणि प्रवासी तसेच वाहकांना येणाऱ्या समस्यांमुळे वादात सापडला आहे. हा प्रकल्प हाताळणारी कंत्राटदार कंपनी खरोखर सक्षम आहे का, यासह निविदा प्रक्रिया, कराराच्या अटी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
१ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांसह तिकीट यंत्रणा हाताळणाऱ्या वाहकांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. कार्ड वापरताना वारंवार तांत्रिक अडथळे येत असून, ऑनलाइन तिकीट काढताना संबंधित सवलत उपलब्ध असल्याचे दिसत असल्याने एनसीएमसी कार्ड सक्तीच्या निर्णयाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
एनसीएमसी कार्ड मिळविण्याची प्रक्रियाही किचकट असल्याचा दावा बरगे यांनी केला आहे. १९९ रुपयांचे कार्ड काही खासगी एजंटांकडून २५० ते ३०० रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. या कथित अतिरिक्त वसुलीची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स असूनही कार्ड रीड होत नसणे, क्यूआर कोड असलेली पावती मशीनकडून स्कॅन न होणे, खात्यातून रक्कम वजा होऊनही तिकीट प्रिंट न होणे, तसेच नेटवर्क आणि सर्व्हरच्या समस्या अशा तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे वाहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे बरगे यांनी नमूद केले.
निविदा प्रक्रिया आणि कराराच्या अटी तपासण्याची मागणी
एनसीएमसी प्रकल्प कंत्राटदार कंपनीला देताना झालेली निविदा प्रक्रिया, करारातील अटी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पद्धत याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुरेसा कालावधी मिळूनही कंपनीला या तांत्रिक अडचणी दूर करता येत नसतील, तर संबंधित कंपनीची प्रकल्प राबविण्याची क्षमता तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण प्रकल्पाची फेरतपासणी करून गरज भासल्यास अंमलबजावणीचा फेरविचार करावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.



