Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणावर सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाल्या…

ठाणे : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणाशी जोडून आरोप केले जात असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.दिशा सालियान प्रकरणाच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव नसल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. “एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव असेल तर मी पुन्हा राजकारणात दिसणार नाही,” असंही त्यांनी म्हटलं.
नितेश राणे यांच्यावर निशाणा साधताना अंधारे यांनी खोटी आणि कपोलकल्पित माहिती पसरवून या प्रकरणावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित काही फोटो आणि पोस्टमॉर्टमबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.पोस्टमॉर्टमसाठी जाणाऱ्या मृतदेहाबाबत बोलताना, पुरुष असो किंवा महिला, पोस्टमॉर्टमच्या प्रक्रियेत मृतदेहाची अवस्था कशी असते याचा संदर्भ देत अंधारे यांनी या मुद्द्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला.
यावेळी सुषमा अंधारे यांनी अन्वय नाईक आणि न्यायमूर्ती बी. एच. लोया प्रकरणाचाही संदर्भ देत भाजपवर टीका केली. या प्रकरणांवर भाजप नेत्यांनी भूमिका घेतली नाही, मात्र दिशा सालियान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचं त्या म्हणाल्या.दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणातील दावे आणि आरोपांबाबत संबंधित तपास यंत्रणांची अधिकृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.



