मुंबई

अभिजात मराठीला दोन वर्षे; पुढे काय झाले?

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मराठी साहित्यिक,राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करत होते.अखेर ३ ऑक्टोबर २०२४ ला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या संवर्धनासाठी नेमक्या कोणत्या योजना प्रत्यक्षात आल्या, संशोधनाला किती चालना मिळाली आणि पुढील दिशा काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.


दर्जा मिळाल्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्राला मिळालेली मंजुरी. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा इतिहास, प्राचीन साहित्य, भाषाविज्ञान, दस्तऐवजीकरण आणि संशोधनाला या केंद्राच्या माध्यमातून संस्थात्मक व्यासपीठ मिळणार आहे. राज्य सरकारने या केंद्रासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अनुवाद अकादमीचीही घोषणा
मराठी साहित्याचा देशभर आणि परदेशात प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुन्या मराठी हस्तलिखितांचे अन्य भाषांमध्ये भाषांतर करण्याबरोबरच भारतीय आणि जागतिक भाषांमधील महत्त्वाचे साहित्य मराठीत आणणे, तसेच प्रशिक्षित अनुवादक तयार करणे, अशी या अकादमीची उद्दिष्टे आहेत. या प्रस्तावासाठी भाषा संचालनालयाने निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि सप्ताह
दर्जा मिळाल्यानंतर राज्य सरकारने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’, तर ३ ते ९ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०२५ मध्ये अमरावती येथे देशातील ११ अभिजात भाषांच्या तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

दर्जा मिळाला; मात्र अंमलबजावणीचा प्रश्न कायम
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धन आणि प्रसारासाठी केंद्र व राज्य पातळीवर विविध उपक्रमांची दिशा निश्चित झाली आहे. मात्र, संशोधन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होणे, पुरातन साहित्याचे मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन, हस्तलिखितांचे जतन, विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये मराठी साहित्याचे भाषांतर आणि नव्या पिढीपर्यंत अभिजात मराठी साहित्य पोहोचवणे, या कामांना पुढील काळात गती देणे आवश्यक ठरणार आहे.

दोन वर्षांपूर्वी मिळालेला अभिजात दर्जा हा मराठीच्या दीर्घ भाषिक इतिहासाला मिळालेला राष्ट्रीय सन्मान ठरला. आता या सन्मानाचे रूपांतर संशोधन, संवर्धन, भाषांतर आणि जागतिक प्रसाराच्या ठोस कामात कितपत होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील गट नेते यशवंत किल्लेदार यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देत
३ ऑक्टोबर २०२४
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आज दोन वर्षे झाली.

दर्जा मिळाला,
पण निधीचं काय? असा प्रश्न केला.

अभिजात भाषेचा मान केवळ कागदावर नको;
मराठीच्या संवर्धनासाठी ठोस निधी आणि कृती हवी.

मराठीला अभिजात दर्जा दिला, आता त्या दर्जाला न्याय कधी देणार?
अशी पोस्ट केली आहे.

Related Articles

Back to top button