Mission Khaki Launch: पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेचा मोठा उपक्रम; शिंदे-कदमांचा पुढाकार

मुंबई :- शिवसेनेच्या पुढाकाराने मिशन खाकी हातात घेण्यात आले असून ‘उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे विद्यार्थी सहाय्यता आणि समन्वय कक्ष’ तसेच ‘मिशन खाकी – पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियाना’चा शुभारंभ आज करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांच्याच शुभहस्ते हे अभियान सुरू करण्यात आले.
पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवा-युवतींच्या स्वप्नांना योग्य आधार आणि दिशा देण्याच्या उद्देशाने ‘मिशन खाकी’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करताना मैदान, सराव, आवश्यक सुविधा, मार्गदर्शन, परीक्षा प्रक्रियेबाबतची माहिती किंवा इतर कोणतीही अडचण येत असल्यास ती आता Google Formच्या माध्यमातून थेट मांडता येणार आहे. आजच्या कार्यक्रमात ही गुगल लिंक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित तरुण तरुणीशी संवाद साधून त्यांना या अभियानामागचा उद्देश विषद केला.
यावेळी बोलताना, हा केवळ एका अभियानाचा शुभारंभ नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या भविष्याला आधार देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. “१८ लाखांपेक्षा जास्त उमेदवार पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत आहेत. ग्रामीण भागातील मुले पहाटे जग झोपलेले असताना मैदानावर घाम गाळतात. या तरुणांच्या खांद्यावर अभिमानाने हात ठेवणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असे सांगितले.
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनीही वेळीच स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून ठाण्यात चिंतामणराव देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. याद्वारे अनेक अधिकारी घडले. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी टक्का अजून वाढायला हवा त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून तेही या माध्यमातून या अभियानाद्वारे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पहिल्या टर्म वेळी आधी निवडणूक लढवून नंतर एमबीबीएसची परीक्षा दिली होती. आज तिसऱ्यांदा खासदार होऊनही त्यांनी आपल्यातील नवीन शिकण्याची भूक कायम ठेवली असून आज ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एमबीए करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्यात नवीन काहीतरी शिकण्याची भूक आहे तोपर्यंत आपल्याला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा विश्वास दिला.

शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण मनात ठेवून काम करणारी संघटना आहे. तरुणांच्या हातात आंदोलनाचे झेंडे देण्याऐवजी त्यांच्या हाताला रोजगाराच्या संधी देणे ही आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत करावी, शिस्त व सातत्य ठेवावे. शिवसेना आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहील असा विश्वास यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. त्यासोबतच पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण तरुणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, आणि विद्यार्थी सहाय्य आणि समन्वय कक्षाचे उद्धव ढवळे आणि श्रीशैल गोटुरी आणि पोलिस भरतीसाठी तयारी करणारे तरुण तरुणी उपस्थित होते.

‘मिशन खाकी’ अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये व उपक्रम
हेल्प डेस्क आणि Google Form द्वारे मदत:
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी एक ‘गूगल फॉर्म’ (गूगल लिंक) उपलब्ध करून देण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना थेट आपल्या समस्या मांडता येतील.
मैदान आणि साहित्याची उपलब्धता
ज्या विद्यार्थ्यांना सरावासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी पालिका व नगरपालिकांच्या माध्यमातून मैदाने दुरुस्त करून dedicated slots दिले जातील. तसेच रनिंग शूज, अभ्यासाचे साहित्य आणि मार्गदर्शन पुरवले जाईल.
विशेष घटकांसाठी प्राधान्य
अनाथ मुले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी या फॉर्ममध्ये विशेष नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून, समाजातील या सर्वात गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यात आली आहे.

मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था.
भरती प्रक्रियेसाठी मुंबई, ठाणे किंवा इतर मोठ्या शहरांत येणाऱ्या तरुणांची राहण्याची व भोजनाची सोय व्हावी यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.
करिअरचे इतर पर्याय व वेळापत्रक समन्वय
एखाद्या परीक्षेत अपयश आले तरी जीवन संपत नाही, या भावनेतून केंद्रीय सुरक्षा दल, पॅरामिलिटरी व इतर सरकारी परीक्षांसाठीही मार्गदर्शन केले जाईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात ‘clash’ होणार नाही, याची काळजी सरकार घेईल.



