मुंबई

Big Update: Election Commission विरोधातील मोर्चाचा मार्ग बदलला; वेळ मात्र ‘जैसे थे’

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चाच्या मार्गात सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार मिलिंद नार्वेकर, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, नगरसेवक यशवंत किल्लेदार, शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यावेळी उपस्थित होते.

अनिल परब यांनी यावेळी सांगितले की, पोलिसांच्या विनंतीनंतर मार्ग बदलला

यापूर्वी हा मोर्चा ‘रिचर्डसन अँड क्रुडास’ ते ‘मुंबई महानगरपालिका’ असा निघणार होता. मात्र, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ शिष्टमंडळात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा मार्ग बदलण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मार्गावर संपूर्ण ब्रिज असून त्यावरून बाहेर पडण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. तसेच, महापालिकेने रस्त्यांच्या मध्ये उभारलेले सुमारे साडेतीन ते चार फुटांचे डिव्हायडर्स यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन ठाकरे बंधूंशी चर्चा करून जुना मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

आता ‘मेट्रो सिनेमा’ ते ‘मुंबई महापालिका’ असा असेल नवीन मार्ग

आता हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’ येथून सुरू होऊन ‘मुंबई महानगरपालिका’ मराठी पत्रकार संघासमोर येथे धडक देईल. यापूर्वी ‘सत्याचा मोर्चा’ ज्या मार्गावरून काढण्यात आला होता, त्याच मार्गाचा अवलंब आता केला जाईल, असे परब यांनी स्पष्ट केले.

वेळेत आणि अंतिम ठिकाणी कोणताही बदल नाही

नेत्यांनी स्पष्ट केले की, मोर्चाच्या मार्गात बदल झाला असला तरी वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा मोर्चा नियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजताच निघेल आणि त्याचा समारोप पूर्ववत महापालिकेसमोरील पत्रकार संघाच्या आवारातच होईल.

मोर्चात सहभागी व्हा! जनतेला आणि कार्यकर्त्यांना आवाहन

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, मित्रपक्ष आणि सामान्य नागरिकांनी या नवीन मार्गाची नोंद घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

प्रश्न आयोगाला उत्तर भाजपची

केंद्रीय निवडणूक आयोगाने घातलेल्या घोळ प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याची उत्तरे भाजपकडून दिली जात आहेत. भाजपने उत्तर देण्याची कारण काय.? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी विचारला. सरकारची लोक गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्रिशूळ आत जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला.

मंत्री नितेश राणे यांच्या निवडीवर आक्षेप

मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर टीका करताना, अमित ठाकरे शिवसेनेच्या (ठाकरे) महेश सावंत यांच्याकडून पराभूत झाले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलण्यापूर्वी सावंत यांच्या राजीनामा मागणार का? असा सवाल विचारला होता. यावर शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी, मंत्री नितेश राणे यांची निवड आक्षेपार्ह असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले.

Related Articles

Back to top button