मुंबई

मुंबईच्या रस्त्यांवर लोकप्रतिनिधींचा झाडू; ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान

मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात आले. विविध ठिकाणी आयोजित स्वच्छता मोहिमांमध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार अमित साटम, मिहिर कोटेचा, अतुल भातखळकर, अमीन पटेल, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी या अभियानात सहभागी झाले.



मणीभवन परिसरातील स्वच्छता मोहिमेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सहभाग घेतला. जुहू समुद्रकिनारी आयोजित मोहिमेत आमदार अमित साटम, तर पी (पूर्व) विभागातील खोडियाल माता मंदिर, धन्जीवाडी परिसरातील उपक्रमात आमदार अतुल भातखळकर सहभागी झाले. वांद्रे येथील बँडस्टॅंड परिसरातील स्वच्छता मोहिमेत अभिनेते महेश मांजरेकर यांनी सहभाग नोंदविला.

घाटकोपर (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक १३२ मध्ये आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत महापौर रितू तावडे सहभागी झाल्या. यावेळी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. महापौर तावडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची स्वच्छता केली आणि नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.


महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेविषयक विचारांना अभिवादन करण्याबरोबरच स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावी, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button