उन्हाचा पारा वाढला,चटक्याने नागरिक घामाघूम

मुंबई : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून तापमानात वाढ झाली आहे.यामुळे मुंबईकरांना उन्हाचा त्रास होत असून घामाच्या धारा लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.वाढत्या उन्हाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरही होत आहे. थकवा,श्वास घेण्यास त्रास,चक्कर येणे यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. परतीच्या पावसाला सुरुवात होत असतानाच मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये उकाड्याची तीव्रता वाढली आहे.
मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि पालघर परिसरात मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक ऊन आणि गर्मिन हैराण झाले. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ८५ टक्क्यांपर्यंत राहिल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उष्णता जाणवत होती.
सकाळपासूनच आकाश निरभ्र राहिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता वाढली. त्यामुळे दुपारच्या वेळी दमट आणि घामट हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागला. कुलाबा, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली परिसरात उकाड्याची तीव्रता विशेष जाणवत होती.हवेचा वेग ताशी १५ ते २० किलोमीटर झाल्याने पुढील काही दिवस मुंबईत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.



