मुंबई

Dharavi Redevelopment: ‘एक्सपिरियन्स सेंटर’मुळे धारावीकरांचा संभ्रम दूर होणार; फडणवीसांचा विश्वास

मुंबई : धारावीचा पुनर्विकास नेमका कसा होणार, पुनर्वसनानंतर घर कसे असेल, रोजगार आणि व्यवसायासाठी कोणत्या सुविधा मिळणार, याची प्रत्यक्ष माहिती आता धारावीकरांना मिळणार आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे पुनर्विकासाबाबतच्या अफवा, गैरसमज आणि अपुऱ्या माहितीला आळा बसेल आणि धारावीकरांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पीएमजीपी कॉलनीतील एच ब्लॉकमध्ये, बीकेसीजवळ हे केंद्र उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राची पाहणी करून तेथील विविध सुविधांची माहिती घेतली.

धारावीचा व्यवसायही कायम राहणार

धारावी ही केवळ रहिवासी वस्ती नसून मोठे आर्थिक केंद्र आहे. कुंभारवाड्यातील मातीची भांडी, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्वापर यासह अनेक छोटे-मोठे व्यवसाय येथे चालतात. पुनर्विकास करताना या व्यवसायांचे महत्त्व लक्षात घेऊन अधिक चांगल्या आणि नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

धारावीची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख कायम ठेवत तिचा विकास करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आपले पुढे काय होणार?’ याचे उत्तर एकाच ठिकाणी

पुनर्विकासानंतर आपले घर कसे असेल? परिसर कसा असेल? रस्ते, मैदाने आणि इतर सुविधा कोणत्या असतील? रोजगाराच्या संधी काय असतील? असे अनेक प्रश्न धारावीकरांच्या मनात आहेत. या प्रश्नांची माहिती ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून दिली जाणार आहे.

धारावीची आजची स्थिती आणि पुनर्विकासानंतरचे संभाव्य चित्र याची माहिती या केंद्रात पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना केवळ आराखडे पाहण्याऐवजी भविष्यातील घर, परिसर आणि कामाच्या ठिकाणाचा अनुभव घेता येईल, असे फडणवीस म्हणाले.

‘धारावी का कल’ गीताचे लाँचिंग

या केंद्रात आधुनिक डिजिटल आणि ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील बदलाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

यावेळी गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या बदलत्या धारावीचे चित्र मांडणाऱ्या ‘धारावी का कल’ या विशेष गीताचे लाँचिंग करण्यात आले. तसेच ‘मेरे सपनों की धारावी’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या वेळी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भिडे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव विपीन पालिवाल, अदाणी नवभारत डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सरदाना, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button