महाराष्ट्र

ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा तडाखा,पावसाची प्रतीक्षा

मुंबई : यावर्षी ऑक्टोबर सुरू होण्यापूर्वीच मुंबई आणि महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविली असल्याने उष्णतेचा जोर अधिक जाणवत आहे.नैर्ऋत्य मोसमी पाऊस ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच देशभरातून माघारी फिरण्याचा अंदाज आहे. त्यानंतर ईशान्य मोसमी वाऱ्यांना सुरुवात होईल. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे सरासरी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी देशाच्या बहुतांश भागात ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबरमध्येही उन्हाचा तडाखा जाणवणार आहे.

ऑक्टोबरमध्ये देशातील एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ८५ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील काही भाग, वायव्य भारताचा काही भाग आणि पूर्व भारतातील काही प्रदेश वगळता बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये देशात सरासरी ७५.४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने रब्बी पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण कमीच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतीसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे ऑक्टोबरच्या उकाड्यातही वाढ होऊ शकते.

ईशान्य भारतातील काही भाग तसेच मध्य आणि वायव्य भारतातील तुरळक भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील बहुतांश भाग वगळता अनेक प्रदेशांत किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पावसाची ओढ कायम असतानाच उन्हाचा ताप वाढण्याची जास्त शक्यता आहे.

Related Articles

Back to top button