CJP Protest:‘परवानगी असो वा नसो’शिवाजी पार्कपासून देशभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : ‘परवानगी दिली असो वा नसो, उद्या शिवाजी पार्कवर आंदोलन करणारच!’ असा थेट इशारा देत कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधातील आंदोलनाची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया थांबवावी, एसआयआर यादी रद्द करावी आणि २०२५च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घ्याव्यात, अशी सीजेपीची प्रमुख मागणी आहे. निवडणूक आयोगाची भूमिका पारदर्शक असावी, अशी मागणी करत दीपके यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.
‘मोदी-शहा यांची हुकूमशाही सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा,’ असे दीपके म्हणाले.
‘आधी शिवाजी पार्क, नंतर देशभर आंदोलन’
सीजेपीच्या आंदोलनाची सुरुवात उद्या शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथून होणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. या आंदोलनासाठी परवानगीचा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
‘आंदोलनाला परवानगी दिली होती का, हा प्रश्नच नाही. परवानगी दिली नाही तरी उद्या शिवाजी पार्क येथे आंदोलन करणारच,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पार्कनंतर गोवा, बंगळुरू, पाटणा आणि रांची येथे आंदोलन करण्यात येणार असून पुढील टप्प्यात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले जाणार आहे.
‘एसआयआर रद्द करा; २०२५च्या मतदार यादीवरच निवडणूक घ्या’
एसआयआर प्रक्रिया थांबवून २०२५च्या मतदार यादीच्या आधारेच निवडणुका घेण्याची मागणी दीपके यांनी केली. ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
‘मुंबई पोलीस दिल्ली पोलीस नाहीत. आम्ही शांततेत आंदोलन करू,’ असे स्पष्ट करत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी पक्षाचा झेंडा न घेता सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण, बेरोजगारी, आरक्षण आणि तरुणांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘जेन जीला हवा तसा देश निर्माण व्हायला हवा. लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत; मात्र सुरक्षित भारतासाठी आम्ही लढायला तयार आहोत,’ असे दीपके यांनी सांगितले.
‘व्यवस्थापन कोटा का? आरक्षण का नको? सरकार उपलब्ध जागा विद्यार्थ्यांना का देत नाही?’ असा सवाल करत त्यांनी शिक्षणव्यवस्थेवरही टीका केली. ‘भाजप लोकसभेत राज्यात हरते; मात्र विधानसभेत जिंकते. हे कशामुळे?’ असा सवालही दीपके यांनी उपस्थित केला.



