मुंबई

Mumbai entry point मुंबईत प्रवेश महागला

आजपासून वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर टोलनाक्यांवर १५ ते ३५ रुपयांपर्यंत दरवाढ

मुंबई : मुंबईत प्रवेश करण्यासाठी असलेल्या एंट्री पॉईंटवर पथकरात दरवाढ करण्यात आले आहे. पाचही टोलनाक्यांवर आज १ ऑक्टोबरपासून ही वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर टोलनाक्यांवर विविध प्रकारच्या वाहनांसाठी १५ ते ३५ रुपयांपर्यंत पथकरवाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या व्यावसायिक आणि अवजड वाहनांचा प्रवास आजपासून महागणार आहे.

नवीन दरानुसार मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी ७५ रुपयांऐवजी ९० रुपये, ट्रक आणि बससाठी १५० रुपयांऐवजी १८० रुपये, तर अवजड वाहनांसाठी १९० रुपयांऐवजी २२५ रुपये पथकर आकारला जाणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास जलद करण्याच्या उद्देशाने एमएसआरडीसीने शहरात ५५ उड्डाणपूल उभारले आहेत. या प्रकल्पांवर झालेला खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर येथे टोलनाके उभारण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवरून २०२७पर्यंत पथकर वसुली सुरू राहणार आहे.

दर तीन वर्षांनी पथकर दरांमध्ये वाढ करण्याची पद्धत आहे. त्यानुसार २०२३मध्ये शेवटची दरवाढ करण्यात आली होती. आता तीन वर्षांनंतर पुन्हा पथकर दरात वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४मध्ये हलकी वाहने, बेस्ट बस, एसटी बस आणि शालेय वाहनांना पथकरातून सूट दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वाहनधारकांना या दरवाढीचा थेट फटका बसणार नसला, तरी मिनी बस, एलसीव्ही, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना वाढीव पथकर द्यावा लागणार आहे.

नवीन पथकर दर :

वाहनांचा प्रकार
जुना टोल
नवीन टोल

मिनी बस, एलसीव्ही
७५ रुपये
९० रुपये

ट्रक, बस
१५० रुपये
१८० रुपये

अवजड वाहने
१९० रुपये
२२५ रुपये

Related Articles

Back to top button