Global Hero! शेकडो जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात; स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

मुंबई : विमान उड्डाणादरम्यान अचानक निर्माण झालेल्या गंभीर संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी झुंज देणारे फ्लायदुबईचे भारतीय वैमानिक स्मित मच्छार सध्या जगभर चर्चेत आहेत. विमानातील को-पायलटने कथितरित्या विमानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी होऊनही परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
को-पायलटचा हल्ला, तरीही झुंज सुरूच
विमान उड्डाणात असताना को-पायलटकडून विमानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी त्याने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मच्छार गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी झाल्यानंतरही त्यांनी कॉकपिटवरील नियंत्रण सोडले नाही.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी शेवटपर्यंत को-पायलटचा प्रतिकार केला. अखेर कॉकपिटचा दरवाजा उघडून त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून काही प्रवासी कॉकपिटकडे धावले आणि त्यांनी को-पायलटला रोखलं.
प्रवाशांचीही मोलाची मदत
कॉकपिटमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर प्रवाशांनीही वैमानिकाला मदत केली. को-पायलटला नियंत्रणात घेतल्यानंतर विमानाचे उड्डाण सुरक्षितपणे पुढे नेण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही कॅप्टन मच्छार यांनी विमान सुरक्षितपणे उतरवले.
या संपूर्ण घटनेत विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, मच्छार यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताळल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
‘खरा हिरो’ म्हणत कौतुक
घटनेची माहिती समोर आल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे जगभरातून कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही मच्छार यांच्या धाडसाचा उल्लेख करत त्यांना ‘खरा हिरो’ म्हटल्याचे आहे.
मच्छार यांनी स्वतः गंभीर जखमी असतानाही विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या प्रसंगावधानाची आणि धैर्याची चर्चा होत आहे.
पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मोदी यांनी मच्छार यांना ‘हिरो’ संबोधले.
गंभीर संकटाचा सामना करताना स्वतः जखमी असूनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. त्यांच्या धाडसामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली, असे मोदी यांनी म्हटले.
मुंबईशीही कनेक्शन
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांचे मुंबईशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या धाडसी कामगिरीची बातमी भारतात आणि विशेषतः मुंबईतही चर्चेचा विषय ठरली आहे.
विमानाच्या कॉकपिटमध्ये निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या मच्छार यांच्या धाडसामुळे ‘पायलटची जबाबदारी केवळ विमान उडवण्यापुरती नसते, तर संकटाच्या क्षणी शेकडो जीवांचे रक्षण करण्याचीही असते’, याची प्रचिती या घटनेतून आली आहे.



