महाराष्ट्र

Political Twist! साताऱ्यात उबाठाला धक्का; शेखर गोरे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

मुंबई : सातारा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख आणि माण-खटाव जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी गोरे यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी, “शेखर गोरे यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” अशी ग्वाही दिली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर शिवसेना काम करत असून राज्याच्या विकासाला गती देण्यासोबतच विविध लोककल्याणकारी योजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे माण-खटावसह सातारा जिल्ह्यात शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. गोरे यांनी माझ्या नेतृत्वावर आणि पक्षावर दाखवलेला विश्वास कायम राखू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असून, पक्ष वाढवून दाखवण्याचा शब्द देतो,” असे शेखर गोरे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले असतानाही आपण संचालक म्हणून निवडून आलो होतो. आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी माण-खटाव तालुक्यातील गोरे यांचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होतें.

Related Articles

Back to top button