मनोरंजनमुंबई

मुंबईत नाटक-सिनेमासह मनोरंजनाचे कार्यक्रम महागण्याची शक्यता

मनोरंजन करात ७०० टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव; विधी समितीने प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवला

मुंबई : मुंबईत नाटक, सिनेमा, कॉन्सर्ट, मेळे आणि अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने मनोरंजन कराच्या विद्यमान दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. वातानुकूलित चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समधील प्रत्येक तिकिटावरील मनोरंजन कर ६० रुपयांवरून थेट ४०० रुपये करण्याचा प्रस्ताव असून, हा सध्याच्या दरापेक्षा सुमारे सातपट आहे. मात्र, प्रस्तावित दरांमध्ये मोठी वाढ असल्याने महापालिकेच्या विधी समितीने हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवला आहे.

महापालिकेच्या मूल्यांकन व संकलन विभागाने विधी समितीच्या बैठकीत मनोरंजन कराच्या सुधारित दरांचा प्रस्ताव सादर केला. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबईत १९६९ मध्ये मनोरंजन कर लागू करण्यात आला. त्यानंतर या कराच्या दरांमध्ये मोठा बदल झालेला नाही. इतर राज्यांमध्ये वेळोवेळी मनोरंजन कराच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात येत असताना मुंबईतील दर अनेक दशकांपासून कायम आहेत, असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे.

प्रस्तावानुसार, बिगर-वातानुकूलित चित्रपटगृहांमधील मनोरंजन कर ४५ रुपयांवरून २०० रुपये प्रति तिकीट करण्याचे सुचविण्यात आले आहे. व्यावसायिक नाटके, कॉन्सर्ट आणि मेळ्यांसाठी कर २५ रुपयांवरून १०० रुपये, तर अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी ३० रुपयांवरून ७५ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. मिनी थिएटर आणि व्हिडिओ प्रदर्शन केंद्रांसाठी प्रथमच प्रति तिकीट ९० रुपये मनोरंजन कर आकारण्याची तरतूद प्रस्तावित आहे. सर्कस आणि कार्निव्हलवरील कर ५० रुपयांवरून १०० रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.

मात्र, प्रस्तावातील दरांमध्ये करण्यात आलेली मोठी वाढ लक्षात घेता विधी समितीने प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिली नाही. दरांचा फेरविचार करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी प्रशासनाला दिल्या.

मराठी-गुजराती कलाकृतींना करमाफी

प्रादेशिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी आणि गुजराती चित्रपट, नाटके तसेच मैफिलींना मनोरंजन करातून १०० टक्के सूट देण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. तसेच चित्रपटगृह अथवा मनोरंजनाच्या ठिकाणांच्या चालकांनी महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत कर भरल्यास सहा टक्के सवलत देण्याची तरतूदही प्रस्तावित आहे.

३६० कोटींचा महसूल ५५० कोटींवर जाण्याचा अंदाज

सध्या महापालिकेला मनोरंजन करातून दरवर्षी सुमारे ३६० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. प्रस्तावित सुधारित दर लागू झाल्यास हा महसूल सुमारे ५०० ते ५५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२७-२८ पासून सुधारित दर लागू करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

मनोरंजन कर वाढविण्याचा प्रस्ताव प्रथम २०१५ मध्ये विचाराधीन आला होता. २०२४ मध्ये प्रशासकीय काळात तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. मात्र, या प्रस्तावाची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही.

Related Articles

Back to top button