मुंबईत २ ऑक्टोबरपासून ‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ अभियान

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २ ऑक्टोबरपासून ‘मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट’ (MDC) अभियान सुरू करण्यात येणार आहे. १०० दिवस चालणाऱ्या या अभियानात अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड तयार करण्याबरोबरच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
अभियानाच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांची Health Facility Registry (HFR) मध्ये, तसेच पात्र डॉक्टर, परिचारिका, आयुष वैद्य, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदी आरोग्य व्यावसायिकांची Healthcare Professional Registry (HPR) मध्ये नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागात अभियान राबविले जाणार असून, संबंधित सहायक आयुक्त आणि उपायुक्त अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
ABHA क्रमांकामुळे नागरिकांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात जोडण्यास मदत होणार असून, महापालिका रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण सेवांमध्ये ‘स्कॅन अँड शेअर’, ई-प्रिस्क्रिप्शन, ई-डिस्चार्ज समरी, डिजिटल प्रयोगशाळा व रेडिओलॉजी अहवाल तसेच इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (EMR) आणि HMIS यांसारख्या डिजिटल आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.
अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जनजागृती, अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, स्वयंसेवक नोंदणी आणि प्रचार साहित्याचे वितरण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात रुग्णालये, दवाखाने, ‘आपला दवाखाना’, प्रसूतिगृहे, प्रशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणी मोहीम राबविण्यात येईल. महापालिका मुख्यालय तसेच विभागीय व प्रशासकीय कार्यालयांत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष ABHA नोंदणी शिबिरेही घेण्यात येणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी घरपोच तसेच विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विशेष ABHA नोंदणी शिबिरेही आयोजित केली जातील.
दरम्यान, शिधावाटप केंद्रांवर पात्र लाभार्थ्यांसाठी PMJAY आणि MJPJAY कार्ड नोंदणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवून रेशन कार्ड किंवा ई-केवायसीच्या आधारे पात्रता पडताळली जाणार आहे.
नागरिकांच्या आरोग्य सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी ABHA कार्ड उपयुक्त ठरणार असल्याने मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा यांनी आरोग्य संस्था आणि आरोग्य व्यावसायिकांची डिजिटल नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



