बोरिवलीत २० अनधिकृत बांधकामे, १५ स्टॉल्सवर कारवाई

मुंबई : मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत बोरिवली पश्चिम परिसरात अनधिकृत बांधकामे आणि स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आर-मध्य विभागाने मंगळवारी लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सबवे रोड परिसरातील २० अनधिकृत बांधकामे आणि १५ अनधिकृत स्टॉल्स हटविले.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार बोरिवली परिसरातील सहा प्रमुख पदपथांवरील सुमारे आठ किलोमीटरचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह परिसरातील पादचाऱ्यांना अधिक मोकळे आणि सलग पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
कारवाईसाठी महापालिकेने दोन जेसीबी, पाच डंपर, १० हून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि २० कामगार तैनात केले होते. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी १५ हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उपायुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजु यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (आर-मध्य विभाग) डॉ. प्रफुल तांबे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.



