ID-compalsary रेल्वे प्रवासात ओळखपत्र अनिवार्य एकाच पीएनआरवरील सर्व प्रवाशांवर दंडाची कारवाई होणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या वतीने १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत तिकिटांची वैधता, सवलतीच्या तिकिटांचा वापर, आरक्षण कोट्यांचा गैरवापर तसेच पासच्या गैरवापरावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान आवश्यक ओळखपत्र आणि पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
एकाच पीएनआरवर (प्रवासी नाव नोंदणी) अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या पीएनआरवरील किमान एका प्रवाशाकडे आरक्षणाच्या वेळी नोंदवलेले मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ओळखपत्र सादर करता न आल्यास संबंधित पीएनआरवरील सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवासी मानून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
या विशेष मोहिमेदरम्यान स्थानकांवर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. सवलतीच्या तिकिटांवर किंवा आरक्षणाच्या विशिष्ट कोट्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संबंधित सवलत किंवा कोट्यासाठीची पात्रता तपासली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे प्रवाशांकडे आहेत का, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
अनारक्षित तिकिटांची सत्यता तपासण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचारी आवश्यकतेनुसार ‘टीटीई अॅप’चा वापर करणार आहेत. आरक्षण सुविधांचा गैरवापर, सवलतींचा दुरुपयोग आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
ई-पास किंवा पीटीओच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या बदल्यात अधिकृत तिकीट किंवा पास प्राप्त झाला आहे, याची खात्री करावी, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



