Monsoon update: महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात; काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी उन्हाचे चटके कायम…
मुंबई : महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला असून, राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म्यानमारच्या किनाऱ्यालगत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. ही हवामान प्रणाली बांगलादेशच्या किनाऱ्याकडे सरकत असताना हळूहळू विरण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतून माघार घेतली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असली तरी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भागांत प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत पाऊस आणि ढगाळ हवामान असतानाच उन्हाचा चटकाही कायम राहणार असल्याने नागरिकांना दुहेरी हवामानाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाची हजेरी, ऑक्टोबरपासून उकाडा
मुंबई आणि परिसरात पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे सकाळी गारवा आणि दिवसा उकाडा, असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
राज्यात पावसाची १९ टक्के तूट
यंदाच्या मान्सूनमध्ये देशासह महाराष्ट्रात पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. देशात सरासरीच्या तुलनेत सुमारे १२ टक्के कमी पाऊस झाला असून, महाराष्ट्रात ही तूट १९ टक्के असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के, तर विदर्भात २६ टक्के पावसाची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या टप्प्यातील पावसाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



