महाराष्ट्र

UCC Committee मध्ये Minority Representation द्या; रईस शेख आग्रही

मुंबई : महाराष्ट्रातील प्रस्तावित समान नागरी संहिता (UCC) तयार करण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायालाही प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव स्वप्नील खाटी यांची भेट घेऊन पत्र दिले.

UCC समितीत निवृत्त IAS अधिकारी शत्रुघ्न सिंग यांची नियुक्ती झाल्यानंतर रईस शेख यांनी ही मागणी केली आहे. UCC च्या मसुद्याची प्रक्रिया अधिक व्यापक आणि पारदर्शक होण्यासाठी समितीत अल्पसंख्याक समुदायातील एक सल्लागार आणि एक सदस्य नियुक्त करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक घेणे यांसारख्या वैयक्तिक आणि कौटुंबिक विषयांवर UCC चा परिणाम होणार असल्याने विविध समाजघटकांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.

निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर समितीतील एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर विशेषतः मुस्लिम समुदायातील पात्र व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. न्यायमूर्ती चव्हाण यांनी समितीच्या सार्वजनिक अभिप्राय घेण्याच्या प्रक्रियेबाबत मतभेद व्यक्त करत राजीनामा दिला होता.

तसेच UCC संदर्भात राज्यातील सर्व समाजघटकांना आपली मते मांडण्यासाठी समितीने पारदर्शक आणि पुरेशी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही रईस शेख यांनी केली आहे. यामध्ये अल्पसंख्याक, महिला, कायदेतज्ज्ञ, धार्मिक व सामाजिक संस्था, नागरी समाज संघटना आणि सामान्य नागरिकांचा समावेश असावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button