मुंबई

MNS Morcha: राज ठाकरेंची आज विभागाध्यक्षांसोबत बैठक; ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेपूर्वी मोठी हालचाल

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्या वेळात शिवतीर्थ येथे मुंबईतील सर्व विभागाध्यक्षांची महत्त्वाची बैठक घेत आहे. ४ ऑक्टोबरच्या जनमोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बैठकीत मोर्चाचे नियोजन, विभागनिहाय तयारी आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबत आढावा घेतला जाणार आहे. राज ठाकरे स्वतः विभागाध्यक्षांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी व्हावेत, यासाठीही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीनंतरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी ११.३० वाजता शिवतीर्थ येथे ही परिषद अपेक्षित असून, मोर्चाची वेळ आणि ठिकाण यावेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. जनमोर्च्यात महाविकास आघाडीतील इतर पक्ष सहभागी होणार आहेत का, याबाबतही यावेळी काही संकेत मिळू शकतो.

४ ऑक्टोबरचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेविरोधात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांनी हा जनमोर्चा जाहीर केला आहे. ठाकरे बंधू या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

राजकीय निरीक्षकांचे लक्ष आजच्या बैठकीकडे आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

Related Articles

Back to top button