महाराष्ट्र

Gyanesh Kumar यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक; राज्यभर तीव्र निषेध मोर्चे

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी राज्यभर आक्रमक आंदोलन केले. मतदारयादीतील कथित फेरफार आरोप आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. यावेळी ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

अमरावतीत ज्ञानेशकुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली, तर ठाण्यात पुतळ्याला उठाबशा काढायला लावून निषेध नोंदवण्यात आला. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, जालना, परभणी, पालघर, नंदुरबार, भंडारा, अकोला यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांत आंदोलन करण्यात आले.

सतेज पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर सहभागी

कोल्हापुरात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे, अमरावतीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे कल्याण काळे, चंद्रपूर येथे प्रतिभा धानोरकर, नांदेड येथे खासदार रवींद्र चव्हाण, लातूर येथे खासदार डॉ. शिवाजी काळगे, तर ठाण्यात माजी खासदार कुमार केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष तसेच युवक आणि महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

‘ज्ञानेशकुमारांना हटवा’

काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून तत्काळ हटवावे, तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत मतदारयादीतील कथित अनियमितता पुराव्यांसह मांडली होती. त्यानंतर दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी आक्षेप घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पुष्टी मिळाल्याचा दावा पक्षाने केला.

‘लढा आणखी तीव्र करणार’

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे केंद्रातील भाजप सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यांच्या कथित कारभारामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

एसआयआरच्या माध्यमातून देशभरातील सुमारे १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केला. ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे

Related Articles

Back to top button