मुंबई

Harshvardhan Sapkal on Fadnavis: राहुल गांधींवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा; सपकाळांचा फडणवीसांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असं थेट प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थिती केला आहे.

मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रश्नांवर तथ्यांच्या आधारे स्पष्टीकरण देण्याऐवजी भाजप नेते राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारसंख्येच्या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावरून फडणवीस राहुल गांधींवर सातत्याने टीका करत असल्याचे सपकाळ म्हणाले.

“मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात,” अशी बोचरी टीका सपकाळ यांनी केली.

‘निवडणूक आयोगाने प्रश्नांची उत्तरे द्यावीत’

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील, तर त्याची उत्तरे आयोगानेच द्यायला हवीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे सपकाळ यांनी म्हटले.

शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका मांडावी. राहुल गांधींवर टीका करणे हा सरकारचा एकमेव कार्यक्रम होऊ नये, अशी टीकाही त्यांनी केली.

‘शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न सोडवा’

“राहुल गांधींच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त झालेली पिके आणि त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी पावले उचलावीत,” असे सपकाळ म्हणाले.

दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

“हे प्रश्न सोडवता येत नसतील, तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे,” असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे .

Related Articles

Back to top button