क्रीडा

विनोद कांबळी सध्या कुठे आहे? ‘निदान’मधील VIDEO मधून खुलासा

ठाणे : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा ठाण्यातील ‘निदान सेंटर फॉर एल्डरली केअर’मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 25 सप्टेंबर 2026 रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्याच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. व्हिडिओमध्ये कांबळी स्वतः कॅमेऱ्याशी संवाद साधताना दिसत असून, ‘निदान’मधील स्वच्छता आणि सुविधांचं कौतुक करताना दिसतात.

‘मला घरी नसल्यासारखं वाटत नाही’

व्हिडिओमध्ये विनोद कांबळीने ‘निदान’मधील आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं. इथल्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आणि सुविधांमुळे आपण आपल्या घरापासून दूर असल्याची भावना होत नसल्याचं त्याने म्हटलं. तसेच केंद्रातील स्वच्छता आणि एकूण व्यवस्था उच्च दर्जाची असल्याचंही कांबळीने सांगितलं.

कासारवडवलीत आहे ‘निदान’ सेंटर

‘निदान सेंटर फॉर एल्डरली केअर’ हे ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली येथे आहे. या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर, नर्स आणि केअरटेकरची सुविधा उपलब्ध असल्याचं वृत्त आहे. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची काळजी, हॉस्पिस केअर आणि डे-केअर सुविधाही येथे दिल्या जातात.

कांबळीच्या सध्याच्या परिस्थितीने चाहत्यांचं लक्ष वेधलं

विनोद कांबळीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्या सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली असून, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, कांबळीने स्वतः व्हिडिओमध्ये ‘निदान’मधील मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

अशी आहे विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द

विनोद कांबळीने भारताकडून 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 1,084 धावा केल्या असून त्याच्या नावावर चार शतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कांबळीने 2,477 धावा केल्या आहेत.

2024 च्या उत्तरार्धात कांबळीला आरोग्याच्या समस्यांमुळे ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 2026 मध्ये तो काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसला. आता ‘निदान’ सेंटरमधील त्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्याच्या सध्याच्या राहणीमानाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button