सण-उत्सवांसाठी FDA ची राज्यभर विशेष मोहीम

गणेश मंडळांचे भंडारा-अन्नछत्रासाठी ३,१९८ ऑनलाइन अर्ज; ३,०६८ आस्थापनांची तपासणी, ६.३४ लाख किलो संशयित अन्नसाठा जप्त
मुंबई : सण-उत्सवांच्या काळात भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आहे. वर्षभरातील सर्व सण-उत्सवांसाठी स्वतंत्र ‘सण-उत्सव अंमलबजावणी पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले असून, गणेशोत्सवात भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसादासाठी गणेश मंडळांनी या पोर्टलवर तब्बल ३,१९८ ऑनलाइन अर्ज दाखल केले. त्यापैकी जोखमीनुसार ३८३ ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
१ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरातील ३,०६८ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्रुटी आढळलेल्या १,५०६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. गंभीर नियमभंग करणाऱ्या २४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर १२ परवाने रद्द करण्यात आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ६९ अंतर्गत ४५५ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी ३९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या कारवाईत सुमारे ५३.६० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान मिठाई, खवा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच उपवासाच्या पदार्थांचे एकूण २,४२३ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरून तब्बल ६,३४,३६२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ९.७६ कोटी रुपये आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ४,४२,७४६ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ६.२३ कोटी रुपये आहे.
सण-उत्सव अंमलबजावणी पोर्टल
सण-उत्सवांसाठीच्या स्थायी आदेशाची प्रभावी, पारदर्शक आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीपासून नाताळपर्यंत वर्षभरातील सणांची दिनदर्शिका या पोर्टलवर उपलब्ध आहे. राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक अशा तीन स्तरांवर सणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
प्रत्येक सणासाठी सणापूर्वी २१ दिवसांपासून सणानंतर ३० दिवसांपर्यंत पूर्वतयारी, उत्पादन तपासणी, जनजागृती, पुरवठा साखळी, किरकोळ विक्री, बाजार संनियंत्रण, अहवाल आणि कायदेशीर कार्यवाहीचे टप्पे निश्चित केले जातात. राज्यातील ९० झोनसाठी पदनिर्देशित अधिकारी निश्चित करण्यात आले असून, तपासणी, नमुने, जप्ती आणि नोटिसांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध होते.
गणेश मंडळांना ऑनलाइन सुविधा
गणेशोत्सवात भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या मंडळांना कार्यालयात न जाता ऑनलाइन माहिती आणि अर्ज सादर करता येत आहेत. मंडळांनी दाखल केलेल्या ३,१९८ अर्जांपैकी जोखमीनुसार ३८३ ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. यावेळी अन्न शिजविण्याची जागा, पिण्याचे पाणी, कच्च्या मालाची गुणवत्ता, अन्नसाठवणूक तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप नाही
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई धार्मिक विधी किंवा श्रद्धेमध्ये हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने नसून, उत्पादन, साठवणूक आणि पुरवठ्याच्या स्रोतांवर केंद्रित आहे. उत्पादन केंद्रे, गिरण्या, खवा मंडया, शीतगृहे, गोदामे आणि घाऊक बाजारपेठांमध्ये सणापूर्वी तपासणी करून असुरक्षित अन्नपदार्थांचा पुरवठा रोखण्यावर भर देण्यात आला आहे.
मोदक, पेढे, खवा, पनीर, तूप, दूध, दही, खाद्यतेल, सुका मेवा तसेच भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांसारख्या पदार्थांची मागणी सणासुदीत मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भेसळयुक्त अथवा असुरक्षित पदार्थ बाजारात येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
सर्व धर्मांच्या सणांचा समावेश
गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसह ईद, नाताळ, गुरुनानक जयंती, उरूस आणि ग्रामदैवतांच्या यात्रांचाही सणांच्या दिनदर्शिकेत समावेश करण्यात आला आहे. संबंधित सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची जोखमीनुसार तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रसाद, मिठाई आणि उपवासाचे पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावेत. दुकानाचा परवाना क्रमांक, ‘Food Safety Connect’ QR कोड, उत्पादन दिनांक आणि मुदत तपासून पक्के बिल घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपवासाचे पीठ आणि इतर पदार्थ शक्यतो लेबल असलेल्या पॅकबंद स्वरूपातच खरेदी करावेत, असेही सांगण्यात आले आहे.
नवरात्र, दुर्गोत्सव आणि आगामी सणांसाठी भंडारा, अन्नछत्र अथवा महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अन्नवाटप परवानाधारक केटररमार्फत करावे आणि कार्यक्रमापूर्वी किमान सात दिवस आधी पदनिर्देशित अधिकाऱ्याला पूर्वसूचना द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांना complaints.mahafda.in या संकेतस्थळावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.
श्रद्धा आणि आरोग्य या दोन्हींचे रक्षण करत प्रत्येक सण आनंदाचा, सुरक्षित आणि भेसळमुक्त व्हावा, यासाठी नागरिक, गणेश मंडळे आणि अन्न व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.



