मुंबई

दुष्काळ कोणत्याही पक्षाचा नसतो, राजकारण बाजूला ठेवून मदत करा, विशेष अधिवेशन बोलावे: उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात असताना सरकारकडून केवळ घोषणा आणि दौरे सुरू आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. सरकारच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यांवर टीका करताना, ‘हे दौरे काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का?’ असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थिती केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे किमान दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. दुष्काळ कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, या पॅकेजमधून प्रत्यक्षात किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

यंदा पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत आला असून अनेक भागांत पिके करपली आहेत. काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यांसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा का करायची, असा सवाल ठाकरे यांनी केला.

‘शेतकऱ्याला तातडीने मदतीची गरज आहे. आणखी दोन-तीन दिवस केवळ घोषणा करण्याची गरज नाही,’ असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कर्जमाफीचा जिल्हानिहाय हिशोब द्या

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली, याची जिल्हानिहाय आणि गावनिहाय माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. केवळ घोषणा न करता कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा स्पष्ट हिशोब जनतेसमोर ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करताना, नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळत नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पीकविमा, नुकसानभरपाई आणि कर्जमाफी या तिन्ही विषयांवर सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तीन विभागांत मंत्रिमंडळ बैठका घ्या

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावून सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीन महसूल विभागांत तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात याव्यात. तसेच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत ठाण मांडून दुष्काळ निवारणाच्या कामाची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

‘दुष्काळ कोणत्याही पक्षाचा नसतो. ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे,’ असे ठाकरे यांनी म्हटले.

Related Articles

Back to top button