मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारणार : एकनाथ शिंदे

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. मुंबई, ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील क्लस्टर पुनर्विकासाला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर पुनर्विकास योजनेचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झाले. सुमारे २० हेक्टर (५० एकर) क्षेत्रावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे सहा हजार कुटुंबांना सुरक्षित आणि पक्की घरे मिळणार आहेत. या परिसरात केवळ निवासी इमारती उभारण्याऐवजी विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, सामुदायिक सभागृह, व्यायामशाळा, योग केंद्र, इनडोअर खेळांची सुविधा, डिजिटल ग्रंथालय, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट पथदिवे आदी सुविधा प्रकल्पात असतील. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेनुसार परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रश्नासाठी आंदोलने आणि उपोषणाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना क्लस्टर पुनर्विकासातील धोरणात्मक अडथळे दूर केल्याचे शिंदे यांनी सांगितले. किसननगरमधील क्लस्टरच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
क्लस्टर पुनर्विकासात निवासी इमारतींबरोबरच व्यावसायिक वापरासाठी जागा आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. घराजवळच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ‘वॉक टू वर्क’ संकल्पना राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धेश्वर तलाव परिसराचा पुनर्विकास करून स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रहिवाशांच्या मागण्यांवर चर्चा करताना कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत त्यांनी दिले.
विकासकांनी बांधकामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करू नये, अशी सूचना शिंदे यांनी केली. नागरिकांना दर्जेदार घरे आणि सुविधा मिळणे महत्त्वाचे असून, त्यासाठी सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाणे आणि परिसरातील वाहतूक व पायाभूत सुविधांमध्ये बदल होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” असे सांगत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या कवितेतील ओळींचा उल्लेख केला. विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देण्याबरोबरच चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी मिश्कीलपणे मोठा टीव्ही भेट देण्याची सूचनाही केली.
कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



