ऐन पावसाळ्यातही राज्याला पाणीटंचाईच्या झळा

मुंबई : पावसाळा अंतिम टप्प्यात आला असतानाही राज्यातील अनेक गावांची पाण्यासाठीची भटकंती थांबलेली नाही. सध्या ४१८ गावे आणि १,५६८ वाड्यांना एकूण ४७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत टँकरची मागणी आणखी वाढली आहे. पाऊस पडत असतानाही शेकडो गावांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे गंभीर वास्तव पुन्हा समोर आले आहे.
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून उपाययोजना आखण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुबलक पाऊस न झाल्याने ग्रामीण भागांत आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ३६२ गावे आणि १,३५४ वाड्यांना ४११ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तिसऱ्या आठवड्यात टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या ५६ ने तर वाड्यांची संख्या २१४ ने वाढली आहे. टँकरची संख्या ६८ ने वाढून ४७९ वर पोहोचली आहे.
अहिल्यानगरला सर्वाधिक झळ
पाणीटंचाईची सर्वाधिक झळ अहिल्यानगर जिल्ह्याला बसत आहे. येथे १११ गावे आणि ५९९ हून अधिक वाड्यांना ११८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सरकारी आणि खासगी टँकरच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही स्थिती चिंताजनक आहे. सातारा जिल्ह्यात ४२ गावे आणि २८० वाड्या, सांगलीत २६ गावे आणि सुमारे १७० वाड्या, तर सोलापूरमध्ये ७७ गावे आणि ३३८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यातही टंचाई कायम
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पाणीटंचाई कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ६६ गावे आणि १४ वाड्या, जालन्यात १२ गावे आणि ९ वाड्या, तर बीडमध्ये ५६ गावे आणि ६८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, बीडमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या वाढली आहे. पावसाळा संपत असतानाही मराठवाड्यातील काही भागांत पाणीटंचाईचे संकट कायम आहे.
नाशिकमध्ये १८ गावे टँकरवर
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील १८ गावे आणि ३७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत सध्या टँकरची नोंद नाही.
कोकण-विदर्भात दिलासा
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची नोंद नाही.



