कसारा लोकलही होणार १५ डब्यांची; टिटवाळ्यातील कामाला वेग, महिनाभरात प्रवाशांना दिलासा

मुंबई: मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील प्रवाशांना मिळणार आहे दिलासा.कल्याण ते कसारा मार्गावर लवकरच पंधरा डब्याची लोकल धावणार आहे.ह्या कामाने गती पकडली असून मध्य रेल्वे प्रशासनाकडून तशी जोरदार तयारी सुरू आहे.कल्याणाच्या पुढे कसारा स्थानकाच्या दिशेने टिटवाळा स्थानकात काम करण्यासाठी १५ दिवसांच्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.यादरम्यान रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरशी संबंधित कामे पूर्ण करण्यात आली आहेत. फलाटाची लांबी वाढविण्याचे काम सुरू आहे. महिनाभरात ही काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, दादर आणि सीएसएमटीहून कसाराकडे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येतील.या मार्गावरील कसारा, आसनगाव, वासिंद, खडवली, टिटवाळा आणि परिसरातील प्रवासी कल्याण,ठाणे,मुंबईत कामासाठी येत असतात त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल केव्हा सुरू झाल्या
१६ ऑक्टोबर २०१२ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलची सुरुवात झाली. जवळपास सात वर्षे १५ डब्यांच्या १६ फेऱ्या सुरू क होत्या.
२०१९ मध्ये आणखी सहा फेऱ्या वाढवण्यात आल्या.
जुलै २०२६ मध्ये १० आणि ऑगस्टमध्ये आणखी २२ फेऱ्या १५ डब्यांच्या करण्यात आल्या.
मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या एकूण ५४ फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्या प्रामुख्याने सीएसएमटी-कर्जत/खोपोली मार्गावर असून, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली स्थानकादरम्यान होतात.
टिटवाळा स्थानकात ४ सप्टेंबरनंतर मध्यरात्रीपासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. यावेळेत इंजिनीअरिंग, ओएचई, सिग्नल आणि टेलिकॉम विभागाने संयुक्तपणे विविध कामे पूर्ण केली. रुळां सिग्नल स्थलांतरण कामे करण्यात आली. या कामांमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला होता. आता फलाटाची लांबी ९० मीटरने वाढवाण्यात येत आहे. यासाठी प्री-फॅब्रिकेटेड सिमेंट बॉक्सचा वापर केला जाणार आहे. याच बरोबर छत उभारणीचे कामही सुरू आहे. कसारा, आसनगाव, वासिंद, खडवली आणि आंबिवली स्थानकांवरील आवश्यक कामे पूर्ण होत आहेत. टिटवाळ्यातील काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर कल्याण ते कसारा तसेच दादर आणि सीएसएमटीहून कसाऱ्यापर्यंत १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याची शक्यता आहे.१५ डब्यांची लोकल सुरू झाल्यावर एका फेरीत २५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करू शकतील.
१२ डब्यांच्या लोकलमध्ये आणखी तीन डबे जोडल्याने १५ डब्यांची लोकल तयार होते. त्यामुळे एका फेरीतील प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढते. मात्र, त्यासाठी संबंधित स्थानकांचे फलाट, सिग्नल व्यवस्था आणि ओव्हरहेड वायरची लांबी व क्षमता १५ डब्यांच्या रेकला अनुरूप असणे आवश्यक आहे.



